घरगुती सिलेंडरसाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांगा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता रायगड जिल्ह्यात उमटू लागले आहेत. गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये पसरल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींच्या कार्यालयांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र, जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात घरगुती सिलिंडर गॅसची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर केला जातो. चुलीची जागा आता गॅस सिलिंडरने घेतल्यामुळे जिल्ह्यात गॅसचे लाखो ग्राहक आहेत. अनेक कुटुंबांकडे सिंगल सिलिंडरसह डबल सिलिंडरची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर संपल्यानंतर अनेक ग्राहकांची मोठी गैरसोय होते. परिणामी, सिलिंडर वेळेवर मिळावा यासाठी ग्राहक आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यात भारत गॅस तसेच एचपी गॅसच्या विविध एजन्सी कार्यरत असून, या एजन्सींमार्फत घरपोच गॅस सिलिंडर पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या भीतीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण होईल या अफवांनी जोर धरला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये गॅस बुकिंग करण्यासाठी अक्षरशः चढाओढ सुरू झाली आहे.
सध्या व्यावसायिक गॅसधारकांना गॅस देण्यावर काही प्रमाणात मर्यादा घालण्यात आल्या असून, घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी एजन्सींकडून प्रयत्न सुरू आहेत. साधारणपणे 15 दिवसांच्या अंतराने मिळणारे सिलिंडर सध्या सुमारे 25 दिवसांच्या अंतराने देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी बुकिंग करताना ओटीपी क्रमांकाची प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे.
गॅसटंचाईच्या भीतीने जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सींच्या कार्यालयासमोर ग्राहकांनी बुकिंग आणि नोंदणीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सकाळच्या वेळेत अनेक एजन्सींसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ग्राहक पहाटेपासूनच रांगा लावून उभे राहात असल्याचेही दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि सध्या कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग साधारणपणे 25 दिवसांच्या कालावधीनंतर करता येते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घाईगडबड करून एजन्सीसमोर गर्दी करू नये. गॅस उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम राखावा. नियमित पद्धतीने बुकिंग केल्यास सर्व ग्राहकांना नियमानुसार गॅस सिलिंडर उपलब्ध होणार असून, नागरिकांनी संयम बाळगावा.
सर्जेराव सोनवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी







