खळबळजनक! घनकरचरा प्रकल्पात नाळसदृश्य पदार्थ

। श्रीवर्धन । सावन तवसाळकर ।
श्रीवर्धन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात एक नाळसदृश्य पदार्थ सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे श्रीवर्धन शहरात फिरणार्‍या घंटागाडीमध्ये हा पदार्थ टाकला असून घंटागाडीतून तो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात आला असल्याचे सांगितले जात आहे.

कोणीतरी अज्ञात इसमाने नवजात अर्भक टाकल्याबाबतची अफवा श्रीवर्धनमध्ये फिरत होती. याबाबत माहिती कळताच नगरपालिका प्रशासनाने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन खड्यात पुरलेलं नाळसदृश्य पदार्थ काढून पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे तपासासाठी पाठविले आहे. वैद्यकिय अधिकार्‍यांनी ती मानवी नाळ असल्याची खात्री करून दिली. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे जबाबदारी देण्यात आली.

याबाबत श्रीवर्धनचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष फैसल हुर्जुक यांना विचारणा केली असता त्यांना कोणतीही कल्पना पालिका प्रशासनाने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब अतिशय गंभीर असून यापूर्वी देखील अशाप्रकारे गुरांचे पाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात आढळले होते. या प्रकारणामुळे जातीय तेड व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. असे प्रकार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात वारंवार घडत आहेत.

या प्रकरणात नाळसदृश्य पदार्थ घंटागाडीत टाकणार्‍या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी शहरातून केली जात आहे. नाळसदृश्य पदार्थ एका दवाखान्याच्या पिशवीत मिळाल्यामुळे व त्याच्या बरोबर औषधांचे पॅकेट असल्यामुळे हा प्रकार शहरातील दवाखान्याशी निगडित असल्याचा संशय वर्तवला जात आहे. त्यामुळे नाळसदृश्य पदार्थ दवाखान्यातून टाकण्यात आला असल्यास पोलीस प्रशासनाने त्याचा तपास लावून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे.

Exit mobile version