| पनवेल | वार्ताहर |
रेवदंडा येथून शाळेत जातो असे सांगून पनवेल या ठिकाणी पळून आलेल्या अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याचा पनवेल तालुका पोलिसांनी पनवेल एसटी स्टँड परिसरात शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केल्यावर पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
रेवदंडा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी भ्रमणध्नीद्वारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना कळविले, की एक अल्पवयीन मुलगा वय वर्ष अंदाजे 13 हा सकाळी शाळेत जातो असे सांगून घरातून निघाला, पण शाळेत न जाता तो पनवेल येथे एसटी बस ने आला आहे. सदर माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस नाईक जयदीप पवार, पोलीस शिपाई सतीश दराडे व चालक नीरज पाटील यांच्या पथकाने पनवेल बस स्थानक पिंजून काढले असता सदर मुलगा शाळेच्या गणवेशात स्थितीत फिरताना आढळून आला.
त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याच्या बाबतची माहिती दिली व रागाच्या भरात आपण आलो असल्याचे त्याने सांगितले. याबाबत तात्काळ रेवदंडा पोलीस ठाण्यात कळविण्यात आले व त्यांनी ही माहिती मुलाचे आई, वडील व शाळेतील शिक्षकांना दिली असता त्यांनी आनंदित होऊन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व त्यांच्या पथकाचे आभार मानले आहेत.