ग्रामीण भागात तटकरेंकडे पाठ: समीर म्हात्रे

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, प्रत्येक घरापर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारादरम्यान बोलताना शिवसेनेचे युवा नेते समीर म्हात्रे यांनी सांगितले की, जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसा गीतेसाहेबांना जनसामान्यांचा पाठिंबा वाढत आहे. अक्षरशः ग्रामीण भागातील जनतेने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठ फिरवली आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात स्वतः खासदार, त्यांची कन्या रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आणि आताच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, त्यांचे चिरंजीव आमदार असे तीन-तीन संविधानात्मक पद असताना पेण तालुक्याच्या विकासाकडे त्यांनी कानाडोळा केला. ज्याप्रकारे त्यांनी रोहा तालुक्यात विकास केला, त्याप्रकारे पेण तालुक्याचा विकास केला नाही. पेण तालुक्याला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली. त्यामुळेच पेणच्या जनतेचे आता ठरलंय की, कितीही प्रलोभने दिली तरी मतदान हे गीते साहेबांनाच करायचं. त्यामुळे पेण तालुक्यातून गीते साहेबांना मोठे मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. गीते साहेब हे चारित्र्यसंपन्न व निष्कलंक माणूस आहेत. त्यामुळे एक नंबरची पसंती ही गीते साहेबांनाच मिळणार आहे, असा विश्‍वासही म्हात्रेंनी व्यक्त केला.

Exit mobile version