केबीजेसी वाघळी संघ विजेता
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्याजवळील वजरोली येथील कै. मधूशेठ काळे क्रीडांगणावर दोन दिवस चौकार षटकारांचा तुफानी आतषबाजीमध्ये रंगलेल्या आणि नागोठणे विभागात नावाजलेल्या ग्रामीण प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर तुकाराम कदम व प्रकाश कदम यांच्या केबीजेसी वाघळी या संघाने आपले नाव कोरले आहे.
वाघळी संघाला 40 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. केबीजेसी वाघळी संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चार षटकात 2 फलंदाज गमावून 79 धावांचा डोंगर रचला. या धावांचा पाठलाग करताना एमडी वॉरियर्स, आमडोशी या संघाला चार षटकांत 2 फलंदाज गमावून केवळ 56 धावाच जमविता आल्याने त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
उपविजेता ठरलेल्या एमडी वॉरियर्स या संघाला 30 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवलेल्या श्री माणकेश्वर प्रसन्न, आमडोशी व आई पळसाई वॉरियर्स, पळस या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ग्रामीण प्रीमियर लीग या नावाजलेल्या क्रिकेट स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांची खैरात करण्यात आली होती. यामध्ये अंतिम सामन्यात 42 गावांची तुफानी खेळी आणि गोलंदाजी करताना एक विकेट मिळवलेल्या वाघळी संघाचा विकास जाधव याने अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून चषक, 20 षटकार मारल्याने सिक्सर किंग म्हणून आकर्षक बॅट, पब्लिक हिरो म्हणून कुलर तसेच मालिकावीर म्हणून आकर्षक सायकल अशी चार पारितोषिके मिळविली.
स्पर्धेत एकूण 124 धावा करणारा उत्कृष्ट फलंदाज म्हणून एमडी वॉरियर्स संघाचा सिद्धेश तेलंगे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आई पळसाई वॉरियर्स संघाचा आर्यन गायकर तर स्पर्धेत एकूण आठ विकेट घेणारा आई पळसाई संघाचा करण राणे या तिघांना प्रत्येकी कुलर व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत उगवता तारा म्हणून केबीजेसी वाघळी संघाचा संस्कार हारपाल याचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेत पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारे विक्रांत पाटील व प्रफुल्ल मात्रे, दोन दिवस स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन करणारे राहुल ताडकर, अतिश सारले व योगेश जाधव यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
रविवारी (दि.12) सायंकाळी संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास केबीसी वाघळी संघाचे मालक तुकाराम कदम व प्रकाश कदम, एमडी वॉरियर्स, आमडोशी संघाचे मालक महादेव दळवी, श्री माणकेश्वर प्रसन्न, आमडोशी संघाचे मालक अनिरुद्ध जाधव, आई पळसाई वॉरियर्स, पळस संघाचे मालक प्रल्हाद राणे, ग्रामीण प्रीमियर लीग असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास गायकर, सुभाष मढवी, अंकुश तेलंगे, सुरेश साळुंखे आदींसह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
