। रशिया । वृत्तसंस्था ।
रशियाच्या हल्ल्यानंतरची युक्रेनमधील भीषण दृष्ये समोर येऊ लागली आहेत. युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाने क्षेपणास्त्रे डागल्याने अवघा देश हादरला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर त्याला युक्रेनकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत असून युक्रेनमधील अनेक शहरांत युद्धाचा भडका उडाला आहे. यात आतापर्यंत किमान १०० जण ठार झाले असून त्यात रशियाच्या ५० सैनिकांचा समावेश आहे तर युक्रेनने ४० सैनिकांना गमावले आहे. युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयातून याबाबत अधिकृत माहिती दिली गेली. रशियाच्या हल्ल्यात आम्ही ४० सैनिक गमावले तर १० नागरिकांनाही प्राणास मुकावे लागले आहे, असे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने सांगितले.
त्याचवेळी युक्रेनचं सैन्य या हल्ल्याचा कडवा प्रतिकार करत आहे. शास्त्य शहरावरील हल्ला परतवून लावताना रशियाच्या ५० सैनिकांना ठार मारण्यात आले, असा दावा युक्रेनकडून करण्यात आला. याशिवाय सहा विमानं, एक हेलिकॉप्टर पाडण्यात आले व दोन रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले, असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे रशियाच्या हल्ल्यातही युक्रेनचे ४० सैनिक मारले गेल्याची माहिती पुढे आली आहे.