। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मेरीटाईम बोर्डाने जंजिरा किल्यात जाणार्या पर्यटकांसाठी खास 400 वाहने पार्कींग होतील अशी 1 कोटी खर्चून पार्किंग बनवली आहे. तसेच, 8 कोटी खर्चून नूतन जेटी तयार करण्यात येत आहे. परंतु, जेटीवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे बांधण्यासाठी गंजलेले लोखंडी पोल वापरण्यात आलेले आहेत. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला जनतेने विरोध दर्शविला आहे.
खरतर मुरुडला पर्यटन विकासासाठी खोरा बंदर महत्वाचे ठिकाण आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदरातून मोठ्या प्रमाणात जलवाहतूक होत असते. सलग सुट्टीत हजारो पर्यटक किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्यावेळी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचबरोबर जेटीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक उभे असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात येणारे कठडे हे मजबूत असले पाहिजेत कारण कठडा तुटला तर अपघात होऊन पर्यटक पाण्यात पडण्याची भीती आहे. परंतु, येथील सुरक्षा कठडे बांधण्यासाठी गंजलेले लोखंड वापरण्यात येत आहेत. हे निकृष्ट दर्जाचे काम थांबवून चांगल्या प्रतीचे लोखंड वापरून लवकर काम पूर्ण करावे, असे निवेदन मुरूडच्या पत्रकारांनी मेरीटाईम बोर्ड अधिकारी सुधीर देवरे यांना केले आहे.