महायुतीत अजूनही रुसवेफुगवे सुरूच

| धुळे | प्रतिनिधी |

धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरणारे असतात. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे व उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. मात्र, युतीच्या पदाधिकार्‍यांत अजूनही मोठ्या प्रमाणात रुसवेफुगवे आहेत.

डॉ. भामरे यांच्या प्रचारात शिंदे गट पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झालेली नाही, तर दुसरीकडे डॉ. बच्छाव यांच्या प्रचाराकडे काँग्रेसच्याच काही नेत्यांनी पाठ फिरवली आहे. धुळे लोकसभेची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली. खासदार डॉ. भामरे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. जवळपास महिनाभर हे नाराजीनाट्य सुरू होते. भेटीगाठी घेत डॉ. भामरे यांनी इच्छुकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शहरात तसेच ग्रामीण भागात मेळावे झाले. या मेळाव्यात उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या एका नेत्याच्या समर्थकांनी दांडी मारली. भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला असला, तरी शिवसेना (शिंदे गट) अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेली नाही. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व आहे. भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचा संयुक्त मेळावा झाल्यावरच प्रचाराला दिशा मिळू शकेल. नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत रणकल्लोळ माजला. पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामा दिल्यावर पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण झाला.

Exit mobile version