। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्या शिक्षकांनी जागतिक महामारी (कोव्हिड-19) च्या काळातही निरंतर शिक्षणकार्य केले आणि नवकल्पना राबवित असंख्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन सुरू ठेवले अशा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजसेवक आणि एस.आर. दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी यांनी यांच्यावतीने सदर शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे.
विविध श्रेणींमध्ये सदर पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून यात नाविण्यपूर्ण शिक्षक- प्राथमिक विभाग (इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी), नाविण्यपूर्ण शिक्षक- माध्यमिक विभाग (इयत्ता 8 वी ते 12 वी), नाविण्यपूर्ण प्राध्यापक- महाविद्यालयीन पदवी विभाग, नाविण्यपूर्ण प्राध्यापक – अभियांत्रिकी महाविद्यालय, नाविण्यपूर्ण प्राध्यापक- व्यवस्थापन महाविद्यालय, नाविण्यपूर्ण प्राध्यापक- वैद्यकीय महाविद्यालय या श्रेणींचा समावेश आहे. विद्यार्थी हितासाठी महामारीच्या काळात केलेले नाविण्यपूर्ण कार्याचे छायाचित्र किंवा ध्वनीमुद्रण(व्हिडीओ) सह केवळ 200 शब्दांमध्ये टीचर्स टॉक ( TCHRTalk) या ऍपद्वारे सादर करावे. शिक्षकांनीही याच ऍपद्वारे वरील अटीसह नामांकन भरणे आवश्यक आहे. या प्रत्येक श्रेणीमधून प्रत्येकी दोन शिक्षकांची निवड सदर पुरस्कारासाठी केली जाणार आहे.
30 ऑगस्ट, 2021 पूर्वी नामांकन सादर करणे आवश्यक आहे. आपल्या सहशिक्षकाला पुरस्कार मिळावा यांसाठी संपूर्ण राज्यातील शाळा तसेच महाविद्यालयांतील इतर शिक्षकांनी यासाठी मतदान करता येणार आहे. टीचर्स टॉक ( TCHRTalk) या ऍपद्वारे मतदान करता येईल. शिक्षकांच्या मतदानाला 90 ट्क्के गुण तर पुरस्कार निवड समितीचे मत 10 टक्के विचारात घेतले जाणार आहे.
सदर निवड समितीमध्ये विश्वस्त सीता दळवी, स्केअर पांडा सहसंस्थापक आशिष जिलानी, डिजिटल एक्सपर्ट नयन भेडा यांचा समावेशअ आहे. 5 सप्टेंबर, शिक्षक दिनाचे औचित्य साधत, या पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे जाहिर केली जातील.
एस.आर. दळवी फाऊंडेशनतर्फे शिक्षक गौरव पुरस्कार
