| मुंबई । वृत्तसंस्था ।
महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून, सचिन तेंडुलकर निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय आयकॉन म्हणून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. अशातच त्याने रतन टाटांसोबतच्या भेटीचा फोटो शेअर करताना एक लांबलचक पोस्ट लिहिली.
एक संस्मरणीय संवाद… मला श्री टाटा यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने मागील रविवार नेहमी आठवणीत राहील असा होता. आम्ही ऑटोमोबाईलवरील आमचे प्रेम, समाजाला परत देण्याची आमची बांधिलकी, वन्यजीव यांच्या रक्षणाची आवड आणि आमच्या प्रेमळ मैत्रीबद्दलच्या चर्चा केल्या. काही आठवणींना उजाळा दिला. टाटा यांच्यासोबत झालेली चर्चा अमूल्य असून, ही भेट एक वेगळाच आनंद देऊन गेली. हा दिवस नेहमीच हसतमुखाने लक्षात ठेवीन. सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा यांच्या फोटोवर नेटकरी कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी सचिनने लिहिलेल्या कॅप्शनला दाद दिली.
सचिनची गोलंदाजीतही कमाल आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने 1998 मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने 17 वर्ष 224 दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 च्या एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 416 डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण 201 बळी घेता आले.