| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी या ठिकाणी कायमच रांगा लागलेल्या असतात. याचदरम्यान, या त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात साधूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराच्या मारहाणीनंतर 52 वर्षीय साधूचा जागीच मृत्यू झाला.
त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापलं असून, आखाड्याचे महंत आक्रमक झाले आहेत. तसेच या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने महंत संतप्त झाले आहेत. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले आहेत. नशेखोरांच्या मारहाणीत संबंधित साधूचा मृत्यू झाल्याचे त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यातील महंतांचा आरोप आहे. या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीतील दारु दुकाने बंद करण्याची मागणी साधू महंतांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची फसवणूक होत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता घडलेल्या घटनेनं परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.