| शहापूर | प्रतिनिधी |
शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध माहुली गडावर ट्रेकसाठी गेलेले मुंबईतील दोन युवक रणजीत झा (19) आणि आमिर मलिक (20) भरकटल्यामुळे अडचणीत सापडले होते. वाट चुकल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पोलीस हेल्पलाइन 112 वर संपर्क साधला. शहापूर पोलिसांनी तात्काळ हेल्प फाऊंडेशनच्या जीवरक्षक दल शहापूर या पथकास मदतीसाठी पाचारण केले. जीवरक्षक दलाचे सदस्य रघुनाथ आगिवले, गुरुनाथ आगिवले, योगेश आगिवले, भूषण विशे, तन्मय निमसे, अमित तावडे, दीपक जाधव, अतुल कापटे आणि समन्वयक समीर चौधरी यांनी त्वरित मोहिम राबवत सायंकाळी अंधारात, पावसाळी हवामानात आणि कठीण चढणीतून युवकांचा शोध घेतला. अखेर सायंकाळी 7 वाजता दोघांशी संपर्क साधून त्यांना सुखरूपपणे खाली आणण्यात आले. संपूर्ण मोहिमेत टॉर्च, हेडलाईट, आवश्यक खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अत्यंत शिस्तबद्ध आणि संयमित कृती केली गेली. साधारण पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सर्वजण सुरक्षितपणे पायथ्याशी पोहोचले.






