| नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा ‘नैना’ प्रकल्प, मेट्रोचे जाळे, जेएनपीटीचा विस्तार तसेच शिवडी-न्हावाशेवा सी-लिंक हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने दळणवळणाच्यादृष्टीने हार्बर मार्गावरील शेवटचे स्थानक असलेल्या पनवेलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय या स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्याही सुटत असल्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ स्थानकातून होत असते. पण, त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.
पादचारी पुलावर नेहमीच कोंडी
पनवेल पूर्ववरून पश्चिमेकडे जाण्यासाठी एकच पूल आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी गर्दीच्या वेळी या पुलावर नेहमी प्रवाशांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले या पुलाचा वापर टाळत आहेत.
पाण्यासाठी पैसे खर्च
रेल्वे स्थानकावर तीन पाण्याच्या एटीएम मशीन बसवल्या आहेत. त्यामध्ये कॉईन टाकून शुद्ध पाणी बाटलीमध्ये भरून घेवू शकत होतो. परंतु, त्या मशीन बंद असल्याने स्थानकात पैसे देवून मिनरल वॉटर घ्यावे लागत आहे.
प्रवाशांच्या तुलनेत तोकडी आसनव्यवस्था
रेल्वे स्थानकामध्ये सात फलाट असून त्यातील चार उपनगरी तर तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता वापरले जातात. लोकल प्लॅटफॉर्वर बसण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.