खुशखबर! महामुंबई मेट्रोची सुरक्षा चाचणी यशस्वी

पेंधर ते सेंट्रल पार्क मार्गाचे काम पूर्ण
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
गेली अठरा दिवस सुरू असलेली नवी मुंबई मेट्रोची रिसर्च डिझाइन अ‍ॅन्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) ची ऑसिलेशन व इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी मंगळवारी पूर्ण झाली. आता भारतीय रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांची चाचणी होणार आहे.

नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याच्या उद्देशाने सिडकोने पेंधर ते सेंट्रल पार्क या पाच किलोमीटर अंतराचे काम पूर्ण केले असून त्याची 28 ऑगस्टपासून रेल्वेच्या आरडीएसओ विभागाच्या वतीने चाचण्या सुरू होत्या. बेलापूर ते पेंदार या पाच किलोमीटरचा मेट्रो मार्ग या वर्षांअखेपर्यंत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी सिडकोने या कामावर देखरेख ठेवण्याची व काम लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली आहे.

महामुंबई क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक सुखकर व्हावी यासाठी सिडकोने चार मेट्रो मार्गाची आखणी केली आहे. त्यातील पहिल्या बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम मे 2011 रोजी सुरू करण्यात आले होते. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे हे काम गेली सहा वर्षे रखडले आहे. त्याला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी चालना दिली असून महामेट्रोकडे देखरेख आणि त्या नंतरचे संचालन सोपिवण्यात आले आहे. मेट्रोसाठी लागणारे व्हायडक्ट,आगार, कार्यशाळा यांची कामे पूर्ण झालेली असून उदवाहन, फर्निचर आणि सिंगल प्रणाली यासारखी काही कामे प्रगतिपथावर आहेत.

मेट्रो चालू करण्यासाठी सर्वात अगोदर भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणार्या आरडीएसओची चाचणी होणे आवश्यक होते. ती चाचणी 28 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून या संस्थेच्या पथकाने गेली 18 दिवस पेंधर ते सेट्रल पार्क या 5.14 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण केली. सिडकोच्या अधिकार्यांनी काही दिवसांपूर्वी या चाचणीची पाहणी केली. या पथकाच्या सूचनेनुसार काही सुधारणा केल्या जाणार असून ही चाचणी मंगळवारी पूर्ण झाली असून आता हे पथक रेल्वे सुरक्षा प्राधिकरणाच्या आयुक्तांना आपला अहवाल साधर करणार असून त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून या मार्गाची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर सुरक्षा आयुक्तालय याबाबत आपला निर्णय देणार आहे. सुरक्षा आयुक्तालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही सेवा लोकार्पण करण्याविषयी सिडको व राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

नवी मुंबई मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सिडको प्रयत्नशील असून ऑसिलेशन चाचणी हा त्यातील महत्त्वाचा टप्पा होता. तो आज पूर्ण झाला असून आरडीएसओकडून या चाचणीचा अहवाल लवकरच आयुक्त रेल्वे सुरक्षा यांना सादर होणार आहे. त्यानंतर सुरक्षा आयुक्तालयाकडून एक चाचणी केली जाणार असून त्यानंतर नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


डॉ. संजय मुखर्जी, एमडी, सिडको

Exit mobile version