। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड पोलिस कल्याण निधीसाठी रायगड पोलीस दलामार्फत अलिबागमध्ये मराठमोळा सागर तरंग सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवार 15 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील मैदानात महाराष्ट्राची हास्य जत्रा, वेगवेगळ्या नृत्य, गाण्यांचा आनंद अलिबागकरांना प्रत्यक्षात लुटता येणार आहे. पोलीस कल्याण निधी वृंध्दीगत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या मान्यतेने व रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होणार आहे.
साहिल मोशन आर्टस् यांच्या मार्फत हा कार्यक्रम प्रस्तूत केला जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून सागर तरंग या कार्यक्रमात संगीत, नाट्य, नृत्याची मेजवानी मिळणार आहे. महाराष्ट्राची लोकपरंपरा जागृत ठेवत मराठमोळ्या सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुरेपुर नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पुष्कर श्रोत्री, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, दत्तु मारे, श्रमेश, प्रथमेश, मिरा जोशी, नवीन प्रभाकर अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील नागरिकांना मनसोक्त पहाता यावा यासाठी माफत दरात तिकीट विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातली पोलीस ठाण्याशी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
यापुर्वी रायगड पोलीस दलामार्फत अलिबागमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. परंतू काही कारणास्तव या कार्यक्रमाला ब्रेक लागला होता. आठ वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा अलिबागमध्ये सागर तरंग नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम नागरिकांना पहाता येणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कलांसह स्थानिक व कोकणातील नामवंत कलाकारदेखील आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.