साहित्य संमेलन : कौतुकाचा सोहळा


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा साहित्य-शारदेच्या दरबारातला उत्सवी सोहळा असल्याचं आपण मानतो. वर्षप्रतिपदेसारखा नववर्षाच्या स्वागताचा सण काय किंवा दसरा-दिवाळीसारखे सण काय, हे आपल्या संस्कृतीचे मानबिंदूच आहेत; साहित्य संमेलन म्हणजेही मराठी भाषेचा महोत्सव आणि आनंदोत्सव असतो. तिथे उत्साह असतो, आनंद असतो, भाषेचा आणि मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान असतो. ज्ञानोबा-तुकोबांनी आपल्या ओंजळीत टाकलेल्या, ङ्गअमृतातेंही पैजा जिंकेफ म्हणून मिरविणार्‍या मराठी भाषेची पताका अवघ्या महाराष्ट्रभूमीने खांद्यावर घेतली आहे. अशा सश्रद्ध वारकर्‍यांची पंढरीच संमेलनस्थळी अवतरते. पंढरीसारखा आषाढी-कार्तिकीचा गजर साहित्य संमेलनातही होतो. संमेलनात ग्रंथांच्या भेटी होतात. साहित्यिकांची जवळून दर्शनं होतात. त्यांना ऐकता येतं, त्यांच्या विचारांमधून स्वतःला तपासून पाहता येतं, समृद्धही करता येतं. पुस्तकांच्या पानांमधलं आणि साहित्यिकांच्या विचारांमधलं संचित मनात साठवून घेऊन तृप्त होता येतं. वैचारिकदृष्ट्या-सांस्कृतिकदृष्ट्या आपण अधिक उन्नत झाल्याचा अनुभवही गाठीला बांधता येतो. साहित्यावर मनापासून प्रेम करणार्‍यांच्या भेटीगाठी होतात. त्यांच्याशी संवादाचे पूल जोडले जातात. माणसं माणसांपासून तुटून दूर जात असल्याच्या आजच्या सामाजिक व्यवस्थेत विचारांच्या अभिसरणाची मोठी गरज आहे. साहित्य संमेलनासारखे सोहळे ही पोकळी भरून काढतात. कोरोनाचं संकट पूर्ण टळल्याचं कुणी सांगत नसलं, तरी आपण त्यातून बर्‍यापैकी सावरलो आहोत.


गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये कुलूपबंद झालेल्या बाजारपेठा आणि आनुषंगिक व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. अतिवृष्टीच्या तडाख्याने सारा परिसर उजाड-उद्ध्वस्त व्हावा; आणि पाऊस ओसरला, सगळीकडे कोवळी उन्हं पसरली की ठिकठिकाणी हिरवे कोंब, इवली रोपं हसताना दिसू लागावीत, तशीच सध्याची स्थिती दिसते आहे. जीवनाची-जगण्याची अनावर ओढ असलेल्या मानवसमूहांनी ङ्गपुनश्‍च हरिओमफ म्हणून नव्यानं जीवनव्यवहार सुरू केले आहेत. नाशिकमध्ये येत्या तीन ते पाच डिसेंबरदरम्यान होत असलेला मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा या पार्श्‍वभूमीवर होतो आहे, याचं भान आपण सगळ्यांनीच सतत जागं ठेवलं पाहिजे.


साहित्य संमेलन आणि वेगवेगळे वाद हे समीकरण अलिकडे जणू ठरूनच गेल्यासारखं झालं आहे. अध्यक्षीय निवडणूक आणि त्या निमित्तानं होणारी वक्तव्यं, प्रचार, गटबाजी हे प्रकार साहित्य महामंडळाच्या निर्णयामुळे आता तरी संपले आहेत; तरीही अध्यक्षांचं नाव निश्‍चित होताना काही असे-तसे आवाज उमटतातच. जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती रँग्लर जयंत नारळीकर यांना अध्यक्षपद दिलं गेल्यामुळे यंदा हा ही वाद झाला नाही. (अर्थात तशा वादाचं काही कारणच नव्हतं. वास्तविक, नारळीकरांसारख्यांनी हे पद स्वीकारल्यानं संमेलनालाही एक वेगळा आयाम मिळाला आहे!) संमेलनाचं स्थळ शहरातल्या शहरातच बदललं गेलं, या किरकोळ मुद्यावरून काही घटकांनी नाराजीचा सूर लावला; पण नंतर तो आपोआप शांत झाला. नंतरही काहींनी संमेलनाला राजकीय मुलामा द्यायचा प्रयत्न करून पाहिला. एखादा राजकीय पक्ष संमेलन हायजॅक करून नेत आहे, असं म्हटलं गेलं. ते आवाज पूर्ण विरून जाण्यातले नाहीत; तेव्हा ते अधूनमधून उमटत राहणारच. मत स्वातंत्र्याच्या, व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याच्या निकषावर ते अभिप्रेतही ठरतं. एक बरं झालं : त्यानं अवघं संमेलनच व्यापून टाकलं गेलं नाही! संमेलनाची निमंत्रणं देण्यावरून, निमंत्रण पत्रिकेतल्या नामोल्लेखांवरून किंवा त्यांच्या क्रमांवरूनही साहित्यिक मानापमानाचे प्रयोग पूर्वी रंगले आहेत. निवास व्यवस्थेवरूनही काही वेळा नाराजी-नाट्य झालं आहे.


संमेलनाचं शिवधनुष्य पेलणार्‍यांनी हे रुसवे-फुगवे लक्षात घेऊन आधीपासूनच दक्षता घेतली आणि सगळी परिस्थिती शांतपणाने हाताळली तर संमेलनपूर्व (नाहक) गोंधळ टाळता येऊ शकतो. यापूर्वीच्या संमेलनांनी तसा आदर्श निर्माण केला आहे. नाशिकमधल्या संमेलनाच्या संयोजकांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी असं काही ङ्गघडवण्याफची फारशी संधी दिलेली नाही, याबद्दल त्यांचं मोकळेपणानं कौतुक करायला हवं. एवढा मोठा उत्सव पार पडावा, त्याचं नेटकं नियोजन व्हावं, यासाठी लागणारी दृष्टी आणि क्षमता संयोजक-कार्यकर्त्यांकडे पुरेपूर असल्यानंच हे घडत आहे, हे स्पष्टच आहे. टीका करणं खूप सोपं असतं. पोहता न येणार्‍याने काठावर बसून ङ्गकसं पोहावंफ याबद्दल मार्गदर्शन करत रहावं, तसंच टीकाकारांचंही होतं. पुरेशी मदत उपलब्ध असतानाही छोटे-छोटे घरगुती समारंभ आयोजित करताना पंचाईत अनुभवणार्‍यांनी, संमेलनासारख्या अतिव्यापक व्यवस्थांची गरज असलेल्या सोहळ्यातल्या किरकोळ उणिवा दर्शविण्यासाठी आवाजाचे बाण आणि भाले बाहेर काढावेत, हे पटत नाही. इथेच सहिष्णू वृत्तीची गरज असते. मराठी माणसाचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून टीकेचं समर्थन केलं जातंही; पण याच लक्षणामागील छिद्रान्वेषी वृत्ती झाकून राहत नाही. मराठीपणाची इतर अनेक चांगली लक्षणंही आपल्या संस्कृतीचं वेगळेपण दर्शविणारी आहेत. त्यांचा विसर पडून कसं चालेल?


ज्ञानपीठानं सन्मानित झालेले कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गावात यंदाचा हा साहित्यसोहळा तब्बल सतरा वर्षांनी होतो आहे. कुसुमाग्रजांच्या नावाचं वलय या नगरीला लाभलं आहे. त्यांच्या पुण्याईचा वरदहस्त यंदाच्या साहित्य संमेलनावर आहे. नारळीकरांसारखा जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखकाचं नेतृत्व अध्यक्षपदाच्या रूपानं या सोहळ्याला लाभणं, हा तर दुर्मिळ योग आहे. संमेलनाच्या यशस्वीतेच्या पारड्यात अशा अनेक बाबी आहेत. खरं म्हणजे संमेलनाच्या यशाची आणि कौतुकाची अक्षरं आधीच लिहिली गेली आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होणं एवढंच काय ते बाकी आहे. संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याचं आयोजन हाच एक प्रचंड आणि अनेक पदरी उद्योग असतो. तो सहजसोपा तर अजिबातच नाही. संमेलनाचं स्थळ निश्‍चित करणं, तिथल्या व्यवस्थांचा अंदाज घेणं, मुख्य मंडपाची उभारणी, इतर कार्यक्रमांची व्यवस्था, तिथली सजावट, संमेलनस्थळाची रोषणाई, कार्यक्रमांची आखणी, संबंधितांशी संपर्क, निमंत्रणांची व्यवस्था, निवास-भोजनाची व्यवस्था, हजारो लोकांसाठीचं भोजन, व्यासपीठाची सजावट, संमेलनाचं बोधचिन्ह तयार करणं, माध्यम-प्रतिनिधींसाठी सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेलं सुसज्ज दालन उभं करणं आणि अशा कामांबरोबरच काहीतरी वेगळा उपक्रम राबविणं हा व्याप खरोखरच खूप मोठा असतो. आयोजकांवर-कार्यकर्त्यांवर त्याचंही मोठं दडपण असतं.


परळी वैजनाथ इथल्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या रात्री मोठा वादळी पाऊस झाला. गोपीनाथ मुंडे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः रात्रभर जागून मुख्य मंडपाची फेरउभारणी केली. दुसर्‍या दिवशी ठरल्यानुसार दिमाखात उद्घाटनही झालं. आदल्या रात्री तिथं वादळी पाऊस झाल्याचा मागमूसही कुठं नव्हता! पुण्यानजीक पिंपरी इथे झालेल्या (2016) साहित्य संमेलनाने अनेक अनुकरणीय उपक्रम केले होते. संमेलनानिमित्त स्मरणिका-विशेषांक प्रसिद्ध करण्याचा पारंपरिक प्रघात बाजूला ठेवून संयोजकांनी ङ्गमराठी भाषा : संचित आणि नव्या दिशाफ हा सव्वाचारशे पृष्ठांचा संग्राह्य ग्रंथ सिद्ध केला होता. त्यात मराठी भाषाव्यवहाराचा विविध अंगांनी विचार केला आहे. ङ्गसाहित्यिक डायरीफसारखी वेगळी निर्मितीही त्यावेळी करण्यात आली होती. प्रतिनिधींची नोंदणी आणि ग्रंथदालन गाळ्यांच्या विक्रीतला एकूण एक रुपया आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी देण्याचं तेव्हा जाहीर करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना प्रत्येकी बारा पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला.

Exit mobile version