लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, अंकुर स्पोर्टस् यांची उपांत्य फेरीत धडक
| मुंबई | प्रतिनिधी |
लायन्स स्पोर्टस्, विजय क्लब, अंकुर स्पोर्टस् यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. काळाचौकीच्या अमर क्रीडा मंडळाला मात्र याकरीता 5-5 चढायांचा जादा डाव खेळावा लागला. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्व. दत्ता गोताड क्रीडांगणावर झालेल्या पहिल्या सामन्यात अमरने ओम् पिंपळेश्वरचे कडवे आव्हान 34-31(8-5) असे मोडून काढले. मध्यांतराला 14-11 अशी आघाडी घेणार्या अमरला ओम् पिंपळेश्वरने पूर्ण डावात 26-26 असे बरोबरीत रोखले. सामन्याचा निकाल ठरविण्याकरीता कबड्डीतील नियमानुसार 5-5 चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. त्यात अमरने 3 गुणांनी बाजी मारली. करण सावर्डेकर, अक्षय पांचाळ अमरकडून, तर शुभम साटम, आकाश सोनार ओम् पिंपळेश्वर कडून उत्कृष्ट खेळले.
दुसर्या सामन्यात लायन्स स्पोर्टस् ने विजय नवनाथला 28-26 असे चकविले. पहिल्या डावात 12-14 अशा 2 गुणांच्या पिछादिवरून लायन्सने विजयाची किमया साधली. राज आचार्य, ऋषिकेश कणेरकर या विजयाचे शिल्पकार ठरले. दीप बोर्डवेकर, मयूर खामकर यांनी विजय नवनाथ कडून शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली. विजय क्लबने जय भारत संघाचा 39-25 असा सहज पराभव केला. सुरुवात आक्रमक करीत विजयने 21-13 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात संयमाने खेळ करीत आपला विजय साकारला. अजिंक्य कापरे, राहुल शिरोडकर, शुभम रहाटे यांनी या विजयात महत्वपूर्ण खेळ केला. निखिल पाटील, अविनाश काविलकर जय भारतकडून बरे खेळले. शेवटच्या सामन्यात अंकुरने गोलफादेवीला 52-13 असे लीलया नमविले. सुशांत साईल, अभिमन्यू पाटील, राकेश भोसले यांच्या झंझावाती खेळाने हा विजय सोपा गेला.