| पनवेल | वार्ताहर |
नेरे, ता. पनवेल येथील सायली श्याम ठाकूर यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षा 2021 मध्ये महिलांमध्ये तृतीय क्रमांक व ओबीसी महिला प्रवर्गात सलग दोन वेळा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
मे 2021 पूर्वपरीक्षा, त्यानंतर मे 2022 साली मुख्य परीक्षा व जानेवारी 2023 मध्ये मुलाखतीचा टप्पा सायलीने यशस्वीपणे पार केला. मंगळवारी (28 फेब्रुवारी) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लवकरच कु. सायलीला उपजिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले जाईल. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण होताच उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे सुपूर्द केली जातील.
सायलीच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे वडील श्याम शंकर ठाकूर, आई उषा श्याम ठाकूर, बहिण शामली भगत व भाऊ उज्वल ठाकूर यांच्यासह गुरुजन व संपूर्ण कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे.
मी सध्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत आहे. उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न असल्यामुळे पुन्हा परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत मेहनतीच्या जोरावर अपेक्षित यश मिळाले. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अथक प्रयत्न यामुळेच यशस्वी होऊ शकले. माझ्या यशाचे श्रेय आई-वडील, बहीण, भाऊ, मार्गदर्शक, हितचिंतक यांच्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबियांना देते.
सायली ठाकूर