समुद्रात बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

मासेमारीसाठीची पूर्वतयारी करायला गेलेल्या गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील तरुण खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रात बोटीवरून पडून ही घटना घडली. सिध्देश शांताराम मोरे (27) असे या तरुणाचे नाव आहे. घरातील कर्ता आणि तरुण पोरगा गेल्याने मोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धेश हा गेली कित्येक वर्षांपासून खलाशी म्हणून काम करत होता. त्यामुळे, तो पट्टीचा पोहणारा होता. तरीही, त्याचा बुडून मृत्यू झाल्याने अनकेांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

वेळणेश्वर येथील सिद्धेश हा खलाशी म्हणून करंजा रायगड येथील बोटमालक किसन कोळी यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. तीन दिवसांपूर्वी मासेमारीसाठी पूर्वतयारी करायला गेले असताना करंजा-रायगड येथील अगदी नजिकच्या समुद्र किनारी बोटीतून पाण्यात पडल्याने समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. येथील पाण्याची पातळी जास्त खोल असल्याने सिद्धेशच्या शोध कार्यात अडथळा येत होता. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यावर म्हणजे समुद्राला ओहोटी सुरू झाल्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता वेळणेश्वर येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version