। उरण । वार्ताहर ।
पावसाळी मासेमारी बंदी असतानाही अवैध मासेमारी करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांना दिले आहे. मात्र, हे आदेश फक्त कागदापुरतेच मर्यादित असल्याचे उघड होते. उरणमध्ये पावसाळी बंदी काळात दरवर्षी अवैध मासेमारी खुलेआम सुरू असते. काही दिवसांपूर्वी करंजा गावातील एका नामांकित सोसायटीच्या पदाधिकार्याची बोट खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली असता त्यातील एक 26 वर्षीय तरुण खलाशी समुदात पडून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उपायुक्त देवरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी घटना घडल्याची कबुली दिली. यावरून अवैध मासेमारी बंदी ही फक्त कागदापुरती मर्यादित ठेवून मत्स्यविभागाच्या आर्थिक साटेलोटातून उरण परिसरात बंदी काळात मासेमारी सुरू असल्याचे उघड होते.