एमपीएससीत राज्यात सायली ठाकूर अव्वल

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या नेरे येथील सायली श्याम ठाकूर हिने एमपीएससी परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शासन सेवेत प्रथम वर्ग अधिकारी म्हणून तिची नियुक्ती करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खडतर अभ्यासाचा डोंगर पार करून सायली ठाकूरने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर पनवेल मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पनवेल मधील नेरे येथील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या सायली शाम ठाकूर हिने उच्च माध्यमिक शिक्षण सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या के.आ.बांठिया विद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने खालापूर जवळील शांतिनिकेतन तंत्र विज्ञान महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली. मात्र खाजगी कंपनीमध्ये सेवा करण्यापेक्षा प्रशासकीय सेवा करून जनसेवा करण्याची जिद्द उराशी बाळगल्याने तिने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सन 2000 मध्ये घेतलेल्या परीक्षेतून राज्यातील ओबीसींच्या महिला प्रवर्गातून तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पनवेलसह राज्याचे नाव उंचावले आहे.

Exit mobile version