आरोग्यसेवेचा आधारस्तंभ ढासळतोय; मानधनाविना होतेय परवड

| अलिबाग | प्रमोद जाधव |
रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या, वेळप्रसंगी स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणाऱ्या रायगड जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकिय अधिकारी व परिचारिकांचे मानधन वेळेवर देण्यास आरोग्य विभाग अपयश ठरत असल्याचे समोर आले आहे. परिचारिका म्हणजे आरोग्य सेवेचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. मात्र त्यांचे जून व जूलै या दोन महिन्याचे मानधन थकले आहे. मानधन वेळेवर मिळत नसल्याने मानधनाविना काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. परिणामी, कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

रायगड जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांवर उपचार वेळेवर व्हावे. त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, पेण, रोहा, कर्जत, श्रीवर्धन, माणगाव, पनवेल येथे उपजिल्हा रुग्णालय, पोलादपूर, महाड, चौक, उरण, जसवली, कशेळे, मुरुड, व म्हसळा येथे ग्रामीण रुग्णालय अशी एकूण 15 रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जाते.

जिल्ह्यात वाढते अपघात, वेगवेगळ्या प्रकारचे होणारे आजार अशा कारणांमुळे रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा ताण पडत आहे. रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यात कंत्राटी स्वरुपात वैद्यकिय अधिकारी व परिचारिकांची नियुक्ती केली.

अकरा महिन्याच्या करारावर डॉक्टर व परिचारिकांना नेमण्यात आले. जिल्ह्यात 24 डॉक्टर व 70 परिचारीकांचा समावेश आहे. यात 31 परिचारीका व 24 वैद्यकिय अधिकारी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत. परंतु या कंत्राटी वैद्यकिय अधिकऱ्यांसह परिचारीकांना वेळेवर मानधन देण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे उघड झाले आहे.

आरोग्य विभागाकडून मिळणारा निधी वेळेवर मिळत नसल्याचा फटका या वैद्यकिय अधिकाऱ्यांसह परिचारिकांना कायमच बसत आला आहे. दोन ते तीन महिने त्यांना वेतनासाठी वाट पहावी लागते. त्यामुळे त्यांच्या महिन्याचा आर्थिक ताळमेळ बसण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मानधन वेळेवर मिळत नसल्याने कामावरही त्याचा परिणाम होत आहे. रात्रीचा दिवस करून सेवा देऊनही मानधन वेळेवर मिळत नसल्याने नाराजीचे सुर उमटत आहेत. पण बोलणार कोणाला, अशी अवस्था या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिकांची झाली आहे. जून व जूलै या दोन महिन्याचे तब्बल 90 लाख रुपयांचा निधी शासनाकडून येणे असताना तो वेळेवर मिळत नसल्याने रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना महिन्याचा खर्च चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कंत्राटी वैद्यकिय अधिकारी व परिचारिकांचे जून व जूलै या दोन महिन्याचे मानधन थकले आहे. ठाणे येथील उपसंचालक कार्यालयाकडे मागणी केली आहे. 90 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे.

आंबादास देवमाने – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय
Exit mobile version