। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था शनिवारी (दि.1) रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने आदर्शच्या कर्मचार्यांना भरघोस वेतनवाढ करण्यात आली आहे. तसेच कर्मचार्यांना पाच लाख रूपयांची कुटुंबासह मेडिक्लेम पॉलिसी व पोस्टाची रु. 10 लाखाची अपघात विमा पॉलिसीची भेट देण्यात येत आहे. या वर्षात सभासदांसाठी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य तपासणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आदर्श भुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुरेश पाटील यांनी दिली. रौप्यमहोत्सवी वर्षात कर्मचार्यांना सरासरी 30 टक्के वेतनवाढ करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ती लागू होईल. यावेळी उपाध्यक्ष सतीश प्रधान, संचालक अनंत म्हात्रे, विजय पटेल, विलाप सरतांडेल, जगदीश पाटील, अभिजीत पाटील, अॅड. वर्षा शेठ, अॅड. रेश्मा पाटील, मीनाक्षी पाटील हे उपस्थित होते.
संस्थेने आतापर्यंत अपंगांना सायकल वाटप, शाळांच्या ग्रंथालयांना पुस्तक वाटप, अलिबाग येथील रूग्णालयातील रूग्णांना फळे व खाऊ वाटप केले आहे. अलिबाग येथील कन्या शाळेतील विद्यार्थीनीचे पालकत्व स्विकारून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आदर्श उचलत आहे. राज्यातील पूरग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देऊन निधी दिला आहे. अलिबाग येथील वात्सल्य अनाथालयास रोख रूपये व वस्तूरूपात मदत केली आहे.
आतापर्यंत पाच सभासदांच्या वारसांना त्याचा लाभ मिळाला आहे. अलिबाग शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण केले. कुरूळ येथील सर्कलचे सुशोभिकरण केले. अपंग, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज दर दिला जातो. घोटवडे गावातील कु. पायल पाटील या कर्णबधीर मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी संस्थेने आर्थिक मदत केली. सु.ए.सो. विद्यालय कुरूळ येथे मुलींचे स्वच्छतागृह बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. सिध्देश्वर येथे गोशाळा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. नागाव येथील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी 11 हजार रूपयांची आर्थिक मदत. सन 2018 साली केरळ मधील पूरग्रस्तांना रु. 51 हजार रूपयांची आर्थिक मदत केली. जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेस 25 बॅरिगेट्स दिल्या आहेत. संस्थेतर्फे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबीर आयोजित केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.