कंत्राटी पोस्टमनचे पगार रखडवले

कोलाड पोस्ट ऑफिसमधील दोघांचा समावेश

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील कोलाड पोस्ट ऑफिसमध्ये कंत्राटी पद्धतीने आऊट साईडर (पोस्टमन) पदावर काम करणाऱ्या दोन कामगारांचे पगार पोस्ट विभागाने रखडवले आहेत.

उच्च शिक्षण घेऊनसुध्दा हाताला रोजगार नसल्याने अनेक तरुण मिळेल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. परंतु, त्यांचा पगारही वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणगाव पोस्ट सब डिव्हिजनच्या देखरेखी खाली येत असलेल्या कोलाड पोस्ट ऑफिसमध्ये कोलाड परिसरातील दोन तरूण कंत्राटी पद्धतीने पोस्टमनपदावर काम करीत होते. या दोघांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार नऊ महिने झाले तरी दिलेला नाही. त्यांचा पगार रखडल्याने त्यांनी अनेकदा माणगाव, अलिबाग येथील ऑफिसमध्ये चकरा मारल्या; परंतु त्यांना नेहमीच उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. या दिवाळीत तरी त्यांचा पगार होईल ही अशा असतानाच त्यांचा अद्याप पगार झाला नसल्याने त्यांची दिवाळीसुद्धा अंधारात गेली आहे. काम करूनसुद्धा पगार मिळत नसल्याने हे तरुण चिंतेत आहेत. त्यामुळे पोस्ट ऑफिसचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये इतर ठिकाणाची पगार वेळेवर होत असताना माणगाव सब डिव्हिजनच्या देखरेखीखाली येत असलेल्या कोलाड पोस्ट ऑफिसमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्याचं पगार का रखडवलेले आहेत. हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यांचा पगार काढण्यात कोणता अधिकारी चालढकल करीत आहे. नक्की गौडबंगाल काय आहे. या सर्व प्रकरणाकडे अलिबाग वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन या कामगारांचा रखडला पगार करावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

Exit mobile version