सार्वजनिक बांधकाम खात्याची दुरूस्ती कामास सुरूवात
| रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग-मुरूड-रोहा तालुक्याला मध्यवर्ती असलेला रेवदंडा-साळाव पूलदुरूस्ती कामास सार्वजनिक बांधकाम खात्याने पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. त्यामुळे पाच टनापेक्षा जास्त अवजड वाहतूक बंद असल्याचे फलक शासनाच्यावतीने लावण्यात आले आहेत. तसेच पुलावरून वाहने सावकाश चालवा व पुलावरती वाहने व दुचाकी थांबविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
रेवदंडा-साळाव पुलाचे दुरूस्ती काम सुरू करण्यात आले असून, अवजड वाहतूक अलिबाग ते साळाव-मुरूडकडे जाण्यासाठी अलिबाग-पोयनाड-वडखळ-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार या मार्गे तसेच अलिबाग-पेझारी-चेकपोस्ट, नागोठणे, कोलाड-रोहा-तळेखार-साळाव-मुरूड, तसेच अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोळी-रोहा-तळेखार-साळाव-मुरूड या मुख्य रस्त्याने करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेवदंडा-साळाव पूल अवजड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने येथून पर्यटकांच्या मोठ्या बसेस व मुरूडकडे जाणारे मालवाहतूक ट्रक यांना त्रासदायक ठरणार आहे. परिणामी, मुरूड पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे मुरूड तालुक्यातील विविध लॉजेस, कॉटेज, रिक्षा व सितारा वाहने, हॉटेल व्यवसाय यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल. तसेच मुरूडकडे जाणारे मालवाहतुक ट्रक वाहतुक बंद झाल्याने अनेक जीवनाश्यक वस्तूंच्या रेलचेलमध्ये फटका बसेल, अशी भीती व्यक्त वर्तविण्यात येत आहे. तरी, पूल दुरूस्तीचे काम त्वरेने पूर्ण करावे व दिवसा व रात्रीच्या वेळी होत असलेली अवजड वाहतूक पूर्णतः बंदी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.