रस्त्यावरुन प्रवास करणे जीवघेणे; नागरिकांकडून संताप व्यक्त
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
साळाव ते तळेखार रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून, या कामासाठी नेमण्यात आलेला परप्रांतीय ठेकेदार कोकणातील पावसाची तीव्रता आणि भौगोलिक परिस्थिती न समजल्याने रस्त्याचे काम अक्षरशः कच्च्या पायावर उभे आहे. सध्या या रस्त्यावरुन प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन वाटचाल करण्यासारखे झाले आहे. रस्त्याचे अस्तित्वच हरवले असून, थेट मातीच्या दलदलित गाड्या आणि पावसाच्या पाण्यात माणसं अडकून पडत आहेत. चिखलमय रस्ता तुडवताना जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे. परंतु, ठेकेदार मस्त आणि नेते स्वस्थ अशी सध्याची स्थिती असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
संबंधित ठेकेदाराने पावसाळ्याच्या काळातही काम सुरू ठेवत तात्पुरती मलमपट्टी करत मनमानी केली. रस्त्याचे कोणतेही योग्य पाणी नियोजन न केल्यामुळे शेतात पाणी-माती जात असून शेतीही संकटात सापडली आहे. या मार्गाचा पर्यायी रस्ताही उपलब्ध नाही, त्यामुळे नागरिक अडकले आहेत आणि अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे.मागील सहा महिन्यांपासून नागरिक त्रस्त असून, अजूनही पावसाळ्याचे महिने शिल्लक आहेत. त्यातच गणपती, सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे जिवावर उठण्यासारखं आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या कामकाजावर नेते मंडळी गप्प आणि प्रशासन तर मूकदर्शक. साळाव चेक पोस्टवरील कॅमेरे बंद असून, ओव्हरलोड वाहतूक खुलेआम सुरू आहे. पोलीस प्रशासनाची मूक संमती असल्याची जनतेत चर्चा आहे.
दरम्यान, संतप्त जनतेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रश्नाकडे कानाडोळा का करत आहेत?, स्थानिक नेत्यांच्या बंद दारामागे चाललेल्या सौद्यांमुळेच का हा रस्ता जनतेसाठी मृत्यूचा सापळा ठरतोय?, साळाव चेक पोस्टवरील बंद कॅमेरे सुरू होणार की नाही? गणपतीत जर मोठा अपघात झाला, नागरिकांचा बळी गेला तर जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
या रस्त्याने प्रवास करणाऱ्या दूधवाल्यांपासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत साऱ्यांचे जीवन धोक्यात का टाकलं जातंय? भ्रष्टाचार आणि दुर्लक्षाच्या दलदलित विकास हरवला, रस्त्याचा निधी मिळूनही कामाची गती नाही, दर्जा नाही आणि उत्तरदायित्व तर दूरच. जनतेला त्रास सहन करूनही कोणी त्यांची दखल घेत नाही. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांची रोजची गैरसोय त्यांच्याच पैशातून उभ्या राहिलेल्या ‘अपयशाचं स्मारक’ ठरत आहे. जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत की, या रस्त्यावर एखादा जीव गमावल्यावर जर संबंधित खात्यांनी आणि नेत्यांनी टाळं लावलेली तोंडं उघडली, तर ती उघडण्यापूर्वीच जनतेचा रोष त्यांना उघडं पाडेल.







