उरणमध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री; कारवाईची मागणी

| उरण | वार्ताहर |
दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक मित्रांना मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू दिल्या जातात. त्यात तयार मिठाईलाही पसंती दिली जाते. पण, ही मिठाई भेसळयुक्त असू शकते. उरण परिसरात अशी भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.

दिवाळीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदा घेत व्यापार्‍यांकडून भेसळयुक्त व बनावट मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्‍वती नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दाखल घ्यावी आणि ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना सावध राहावे. बाजारात भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: दुधापासून बनविलेल्या खव्याची मिठाई सर्वोत्तम असते.

मात्र, खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ व रासायनिक पदार्थ वापरून भेसळयुक्त मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. बनावट खवा बनविणारे परप्रांतीय असल्याचे सांगितले जाते. मिठाई दुकानदार त्यांच्याकडून खवा विकत घेऊन त्याची मिठाई विकतात. प्रशासन विभागाकडूनही उघड्यावरून अन्नाचे नमुने तपासले जात नाहीत. त्यामुळे भेसळयुक्त मिठाईची तपासणी करून कारवाई करण्याकडे हा विभाग तत्परता न दाखविता उदासीनच आहे. त्यामुळे बनावट खवा – मिठाई दुकानदारांचे फावते आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने याची दखल घ्यावी, असे आवाहन उरणमधील सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.

Exit mobile version