| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात झटपट पैसा कमविण्याची शर्यतच सुरू आहे की काय अशीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. गोदरेज कंपनीच्या प्रकरणानंतर आता आय आर बी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक कंत्राटी स्वरूपात कार्यरत असणाऱ्या कामगाराने आय आर बी कंपनीचा फ्री टोल करण्यासाठी आय आर बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा व्ही आय पी पासेस विक्री केल्याचे समोर आले. याबाबत आय आर बी कंपनीच्या वतीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. याबाबत जबाबानंतर पोलीस अधीक्षक रायगड आंचल दलाल यांच्या आदेशानुसार खालापूर पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर केले असता खालापूर न्यायालयाने अधिक तपासासाठी 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यात सावरोली गावजवळ खालापूर टोल नाका आहे, या ठिकाणी स्थानिक कामगारांना सुरक्षारक्षक म्हणून नोकऱ्या दिल्या आहेत. यात सावरोली गावातील ओंकार रामचंद्र महाडिक हा आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी घराचा उदरनिर्वाह च्या दृष्टीने आय आर बी कंपनीने ठेकेदारी पध्द्तीवर सुरक्षारक्षक म्हणून कामावर रुजू केला होता. यावेळी त्याने रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथून पुण्याला ये-जा करणाऱ्या वाहन मालकांसोबत ओळख केली. त्यानंतर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा बोगस टोल फ्री व्हीआयपी पास बनवून त्याची विक्री केली. मात्र, अचानक टोलनाक्यावर व्हीआयपी टोल पास वापरणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्याचे कंपनीचे अधिकारी जयवंत देसले यांच्या लक्षात आल्याने याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
आयआरबी कंपनीकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सुरक्षारक्षकावर कारवाई करण्याचे आदेश खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना दिले. त्यानुसार पोलिसांनी ओंकार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांशी मिलिभगत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.






