उरणमध्ये बनावट दारूची विक्री; कारवाईची मागणी

। उरण । घन:श्याम कडू ।
उरणमध्ये बनावट दारूची सर्रासपणे दारूची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणार्‍या दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र उरण तालुक्यात व शहरात दारू विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होऊनही त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आता तर दोन दिवसांनंतर श्रावण महिना सुरू होणार असल्याने त्याआधी गटारी निमिताने दारूला मागणी जास्त असल्याने उरणमध्ये ओरिजनल दारूच्या नावाखाली बनावट दारूची सर्रासपणे विक्री केली जात असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांवरच निर्बंध आले आहेत. दारू विक्रेत्यांनाही नियमांच्या बंधनात राहून दारू विक्री करण्याचे असतानाही त्या नियमाला बगल देत खुलेआम दारूची विक्री केली जात आहे. त्यामध्ये बनावट दारूचाही समावेश असतो. याबाबत जिल्ह्यातील उल्लंघन करणार्‍या इतर दारू विक्रेत्यांवर अधिकारी वर्गांनी कारवाई केली आहे. परंतु उरणमधील उल्लंघन करणार्‍या अशा कोणत्याही दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही. श्रावण महिना दोन दिवसांत सुरू होणार असल्याने खवये दारू व मटण-मच्छीवर ताव मारण्याच्या तयारीत आहेत. याचाच फायदा दारू विक्रेत्यांनी उचलत बनावट दारू विक्री करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. काही दारू विक्रेते तालुक्यातील गावागावात बेकायदेशीरपणे दारू खासगी गाड्या व रिक्षातून घरपोच पोहचवीत आहेत.

उरण परिसरातील दारू विक्रेत्यांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून बनावट दारूची विक्री केली जात आहे. तरी उत्पादन शुल्कचे येथील अधिकारी वर्ग यांच्याकडून कारवाई होत नसल्याने वरिष्ठ अधिकारी वर्गांनी याची दखल घेऊन उरणमध्ये बनावट दारूची विक्री करणार्‍या दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version