16 हजारांचा गुटखा जप्त
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या भर नाक्यावरील परिसरात बिनधास्तपणे सुगंधी गुटखा विक्री करणाऱ्या एक होलसेल किराणा दुकानावर नागोठणे पोलिसांनी बुधवारी (दि.5) दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. या कारवाईत नागोठणे पोलिसांनी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्या दुकानातील एका व्यक्तीला नागोठणे पोलिसांनी अटक केली असून, रोहा येथील फौजदारी न्यायालयाने या आरोपीला 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यातील गुटखा खरेदी करणारा आमटेम येथील दुसरा आरोपी फरार असून, नागोठणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्र राज्यात सुगंधी गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांच्या साठवणूक व विक्रीवर महाराष्ट्र शासनाने जुलै 2011 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही नागोठण्यात काही दुकानदार चोरी छुपे गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी नागोठणे बाजारपेठ व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तपासणी मोहीम राबविली. यावेळी संबंधित दुकानात मानवी आरोग्यास अपायकारक ठरणारा ‘केसरयुक्त विमल मसाला’ या नावाचे चॉकलेटी रंगाचे प्रत्येकी 198 रुपये व एकूण 14 हजार 652 रुपये किमतीचे 74 पॅकेट आढळून आले. तसेच ‘1 तंबाखू’ नावाचे प्रत्येकी 22 रुपये व एकूण 1 हजार 628 रुपये किमतीचे 74 पॅकेट आढळून आले. या सर्व गुटखा मालाची एकूण किंमत 16 हजार, 280 रुपये आहे. असे असले तरी या दुकानदारांना गुटखा माल पुरविणारा होलसेल मोठा व्यापारी असलेला ‘गुटखा किंग’ मात्र पोलिसांपासून अजून चार हात दूरच असल्याने त्याचाही पोलिसांनी शोध घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज पाटील करीत आहेत.
