श्रीवर्धनमध्ये नशेच्या पदार्थांची विक्री जोरात

पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यात सध्या गांजा, चरस यासारख्या नशा करणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काही अमली पदार्थ विक्रेते चरस व गांजा हे पदार्थ खुले आम पणे विक्री करत आहेत. सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये बॉक्साईटचे उत्खनन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. उत्खनन केलेले बॉक्साईड क्षमतेपेक्षा जास्त भरून अनेक डंपर वाहतूक करत आहेत. हे डंपर चालवणाऱ्या वाहनांवरील अनेक चालक हे गांजा व चरस याची नशा करत असल्याचे पाहायला मिळते. अनेक वेळा अशाच अमली पदार्थांची नशा करून वाहन चालवत असताना अपघात देखील झालेले पाहायला मिळाले आहेत.

चरस गांजा यासारख्या नशेच्या पदार्थांची विक्री खुले आमपणे होत असल्याने तरुण पिढी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक तरुण निर्मनुष्य जागी जाऊन किंवा समुद्रकिनाऱ्यावर एका आड बाजूला जाऊन अशा प्रकारची नशा करताना आढळून येतात. श्रीवर्धन तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा व चरस कुठून आणला जातो याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. काही तरुण या अमली पदार्थांच्या नशेच्या एवढे अधीन झाले आहेत की, श्रीवर्धन परिसरात जर का त्यांना हे पदार्थ मिळाले नाहीत तर ते आणण्यासाठी दूरवर सुद्धा जातात. तरी पोलिसांनी अशाप्रकारे चरस, गांजा यासारख्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची गरज आहे. रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशाप्रकारे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलायला हवीत. अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे

Exit mobile version