पोटच्या मुलाची विक्री

महिलेला केली अटक
महिला व बालविकास विभागाची कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।
नेरुळ रेल्वे स्थानकाच्या आवारात राहणार्‍या एका दाम्पत्याने आपल्या पोटच्या 3 मुलांची लाखो रुपयांमध्ये विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्हा महिला व चालविकास विभागाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने नेरुळ पोलिसांच्या मदतीने मुलांची बेकायदेशीरीत्या विक्री करणार्‍या शारदा अयुब शेख (30) या महिलेला ताब्यात घेतले आहे. मात्र यावेळी या कारवाईची कुणकुण लागताच शारदाचा पती अयुब शेख पळून गेला असून नेरुळ पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. तर विक्री करण्यात आलेल्या बाळांपैकी 2 मुलांना महिला व बालविकास विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी महिला काही दिवस गरोदर अवस्थेत व काही दिवस बाळासह नेरळ रेल्वे स्थानकात आढळून येत होती. मात्र काही दिवसानंतर ती एकटी निदर्शनास येत होती. यामुळे एका स्वंयसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याने संशयावरुन मागील काही महिन्यांपासून या महिलेवर पाळत ठेवली होती. हा संशय सत्यात येत प्रसूती काळाच्या काही दिवसानंतर ती एकटीच असल्याचे तसेच तिच्याजवळ असलेले बाळ गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे सदर महिला आपल्या बाळांची बेकायदेशीररीत्या विक्री करत असल्याचे स्पष्ट झाल्या नंतर त्यांनी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला याबाबतची माहिती दिली. यानुसार महिला व बालविकास विभागाने गुरुवारी नेरुळ पोलीस व चाईल्ड लाईन कार्यकर्त्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान, आरोपी दाम्पत्यांने त्यांच्या तीन मुलांची काही लाखांमध्ये विक्री केल्याची माहिती दिली. यापैकी जुलै 2019 मध्ये सीबीडीतील एका महिलेल 90 हजार रुपयांत आपल्या लहान बळाला विकल्याचे तसेच गेल्या महिन्यामध्ये आपल्या नवजात बाळाला सोलापूर येथील महिलेला 2 लाख रुपयांमध्ये विकल्याचे सांगितले. तसेच तीन वर्षापुर्वी देखील तिने दिड लाख रुपयांमध्ये आपल्या बाळाची विक्री केल्याचे सांगितले. यानुसार महिला व बालविकास विभागाने शारदा रोख व अयुब शेख यांच्याकडून बेकायदेशीररीत्या बाळ विकत घेणार्‍या सीबीडी व सोलापूर येथील महिलांना बाळासह बोलावून घेऊन त्यांच्याकडून मुलांना ताब्यात घेतले.

Exit mobile version