सराफ व्यावसायिकांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
पनवेल | वार्ताहर |
गणरायाच्या लोभस मूर्तीला विविध दागिन्यांनी सजवण्यासाठी सराफ व्यावसायिकांकडे गर्दी होवू लागते मात्र यंदा सराफ व्यावसायिकांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळालं. जानव, किरीट, श्रीमंत हार, जास्वंद हार, बाजूबंद, दूर्वा अशा अनेक आभूषणांची सराफांकडे रेलचेल असून चांदीच्या समया, दिवे, वाटी, उदबत्ती घर आदी वस्तूनाही मागणी असते. सोन्यापेक्षा चांदीच्या दागिन्यांना अधिक पसंती असते. भाव स्थिरावलले आहेत मात्र तरी चांदीच्या वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे.
भावांमध्ये चढ-उतार होत असले तरीही गणेशोत्सवासाठी नागरिक चांदी अथवा सोन्याच्या वस्तूंची खरेदी आवर्जून करतात. दागिन्यांमधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी असल्याने त्यांना यंदाही मागणी वाढेल अशी सराफा व्यावसायिकांना आशा होती. बाप्पासाठी दागिन्यांमध्ये जानवं, किरीट, हार, दुर्वा असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जानव्यात पिळीचे जानवे, साधे जानवे, हारांमध्ये दगडूशेठ हार, सोनचाफा हार, जास्वंदांच्या फुलांचा हार तसेच दुर्वांची जुड़ी, किरीट, मुकुट, बाजूबंद असे असंख्य पर्याय आहेत. 500 रुपयांपासून सुरु होणारे दागिने 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत . वाटी, चमचे, उदबत्ती घर, शंख, विडा, सुपारी मोदक आदी पूच्या साहित्याच्या वस्तूही सराफांकडे मिळत आहेत. मोदकांमध्ये 11 मोदकांचा आणि 21 मोदकांचा सेटही आहे तर चांदीचा आंबा, सफरचंद, केळी व त्यांचे घड, अननस, पेरू असे हटके प्रकारही उपलब्ध आहेत… गेल्या काही महिन्यात चांदीचे भाव 70-75 हजारांवरून 65 हजार रुपये प्रति किलोवर येऊन स्थिरावले आहेत. गणेशोत्सव काळात चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती असते. दागिन्यांमध्ये नवीन आलेल्या शमीच्या पानांच्या आणि मंदारफुलांच्या हारांना विशेष मागणी असते.
सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू घरात असल्या तरी त्यात सणाच्या निमित्ताने भर टाकण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे खरेदीची वर्दळ कधीच कमी होत नाही. गेल्यावर्षी कोरोनामुळे काहीसा फटका बसला असला तरी यंदा पुन्हा जुन्या उत्साहाने खरेदीला सुरुवात होईल अशी आशा होती. मात्र हवा तसा व्यवसाय झालेला नाही अशी माहिती स्वस्तिक ज्वेलर्सचे अविनाश मगर यांनी दिली.
या वर्षी हवा तसा व्यवसाय नाही. गनेशोत्सव काळात व्यवसाय चांगला होत असतो. आम्हाला सुद्धा आशा होती व्यवसाय चांगला होईल.
कमल कोठारी : अध्यक्ष, ज्वेलर्स असोशियेशन
कोरोनाचां फटका कायम आहे. गणपतीला दिवसाला 40 ते 50 ग्राहक दागिन्यांसाठी यायची आता 5 ग्राहक सुद्धा नाहीत. दुकान ओस पडली आहेत. भाव कमी झाला तरी लोकं जुनीच वस्तू वापरायला प्राधान्य देत आहेत.
चत्तरमल मेहता , अध्यक्ष, ज्वेलर्स असोशियेशन