क्रिकेटमध्ये षटकार हा प्रकार दुर्मिळ होता त्या काळात म्हणजे 1960 आणि 70 च्या दशकात सलीम दुराणी भारतासाठी खेळले. सलीम फलंदाजीसाठी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येत. प्रेक्षक वुई वाँट सिक्सर असा ओरडा करीत. सलीम दुराणी ती मागणी पूर्ण करीत. अर्थात, फटकेबाजीच्या नादात ते फार काळ खेळपट्टीवर टिकून राहू शकत नसत. पण लोकांना ते चालत असे. त्यावेळी क्रिकेट म्हणजे पाच दिवसांचे सामने हेच समीकरण होते. एक दिवसाचे सामने 1975 च्या विश्वचषकानंतर लोकप्रिय झाले. पण भारतीय खेळाडू बराच काळ जुन्याच रीतीने खेळत होते. तेव्हा विश्वचषक सामने साठ षटकांचे असत. पहिल्या विश्वचषकात आपला लिटल मास्टर सुनील गावसकरने साठ षटके खेळून 36 धावा केल्या होत्या. हा एक वेगळा जागतिक विक्रमच असावा. मुद्दा असा की, सलीम दुराणी हे मात्र कसोटीतही आजच्या ट्वेंटी ट्वेंटीसारखे क्रिकेट खेळत होते. सलीम दुराणी आज असते तर त्यांनी हा काळ गाजवला असता यात शंका नाही. त्यांचे बाकीचे सहकारी हे क्रिकेट हे अतिशय गंभीरपणे खेळणारे होते. सलीम मात्र खुशमिजाज होते. मजेसाठी आणि मजेमजेत ते खेळत. त्यावेळी एक कसोटी सामना खेळण्यासाठी अवघे तीनशे रुपये मिळत. त्यामुळेच 1960 ते 73 या तेरा वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत ते अवघे 29 कसोटी खेळले. त्यातही आठ त्यावेळी सर्वोत्तम मानल्या जाणार्या वेस्ट इंडिजविरुध्द होत्या. केवळ एक शतक आणि 25 च्या आसपासची सरासरी हे त्यांची गुलहौशी वृत्ती दर्शवणारे आकडे आहेत. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजीही ते करीत. तिथेही ते सांगून समोरच्याला बाद करीत असत असे काही किस्से सांगितले जातात. पोर्ट ऑफ स्पेन कसोटीमध्ये कप्तान अजित वाडेकरला सलीम दुराणी म्हणाले की, क्लाईव्ह लॉईड फलंदाजीला असेल तेव्हा मला गोलंदाजी करू दे. त्याप्रमाणे वाडेकरने त्याप्रमाणे त्यांच्याकडे चेंडू दिला. त्यांनी खरोखरच लॉईडला बाद केले. इतकेच नाही लगेचच सोबर्सला शून्यावर बाद करून जबर हादरा दिला. ती कसोटी भारताने जिंकली. विंडिजमध्ये विंडीजला हरवता येऊ शकते हे त्या संघाने दाखवून दिले. गावसकर, सरदेसाई, सोलकर, आपले फिरकी गोलंदाज यांच्यासोबतच सलीम दुरानी यांच्यासारख्या करामती खेळाडूंचाही त्यात वाटा होता. के. श्रीकांत, वीरेंद्र सेहवाग हे अलिकडच्या काळातले दुराणी यांचे वारसदार म्हणावे लागतील. आज क्रिकेटमधील स्पर्धा कमालीची वाढली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी अक्षरशः रोबोसारखी आणि सातत्याने कामगिरी करावी अशी अपेक्षा असते. अन्यथा खेळाडू बाहेर फेकले जातात. अशा काळात दुराणी यांच्यासारखे उस्फूर्त आणि मजेसाठी खेळणारे नाहीसे होत आहेत. त्यांना श्रध्दांजली.
खुशमिजाज सलीम

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026