उघाडीचे दरवाजे तुटल्याने खारेपाणी शेतीत

अधिकार्‍यांचे दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांचे नुकसान
कारवाई करण्याची शेकापची मागणी
पेण | प्रतिनिधी |
तालुक्यातील खाडीलगत असणार्‍या सरेभाग व पिटुकले उघाडीचे दरवाजे तुटल्याने खाडीतील खारेपाणी शेतामध्ये घुसले आणि त्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली असून, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साटेलोट्यामुळे खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या घटनेस खारलँड अधिकारी जबाबदार असून, अशा बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तसेच शेतीच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
30 सप्टेंबर 2019 रोजी याच खराब झालेल्या दरवाजांबाबत खारभूमी विकास कार्यालयाला लेखी पत्रव्यवहार करूनदेखील या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली गेल्यानेच आज ही परिस्थिती उध्दभवली असल्याचा दावा स्थानिक शेतकरी करत आहेत. त्यामुळे आज जे काही खारेपाणी पिकत्या शेतीमध्ये घुसलेले आहे, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही खारलँडच्या अधिकारी वर्गाची आहे. ही जमीन जास्त दिवस खार्‍या पाण्याखाली राहिल्यास नापिक होण्याचा धोका नाकारता येणार नाही. स्थानिक आमदार, पालकमंत्री, खासदार एवढ्या मोठया प्रमाणात शेतीमध्ये खारे पाणी शिरलय त्या वर बोलायला तयार नाहीत. आज एकीकडे परतीच्या पावसाने शेतकर्‍यांना मेटाकुटीस आणले आहे. तर दुसरी कडे या फुटलेल्या उघाडीने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणीच पळुन नेले आहे. जर अधिकारी वर्गाना लेखी पत्रव्यवहार करून देखील खारबंधिस्तीच्या उघाडीची कामे करू शकत नसल्यास या अधिकार्‍यां विरूध्द कामात हलगर्जी पणा म्हणून योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे.
सरकारी अधिकार्‍यांच्या बेजबाबदार व काम चुकार सवयींमुळे एकंदरीत बळीराजाला देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेच बोलावे लागेल. तरी झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी युध्द पातळीवर करून त्याचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षा कडून करण्यात येत आहेत. तसेच बेजबाबदार अधिकार्‍यां विरूध्द ठोस कारवाई करण्याची मागणी पक्षाकडून होत आहे.

दोन दिवस कार्यालयाला सुट्टी आहे. मात्र, या घटनेची नक्कीच आम्ही दखल घेऊन येत्या दोन दिवसांत उघाडीची आणि तुटलेल्या दरवाजांची पाहणी करून ते दरवाजे सुस्थितीत बसविण्याला प्राधान्य देण्यात येईल.
अर्जुन कोळी, खारलँड अधिकारी

Exit mobile version