। रायगड । वार्ताहर ।
जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास दरवर्षी रायगड पोलीस दलामार्फत सशस्त्र मानवंदना देण्यात येते. हि परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु आहे.
ही मानवंदना अतिशय भव्य आणि दिमाखदार स्वरूपात करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी मागील वर्षी दिले होते. त्यानुसार यंदा रायगड पोलिसांनी धावीर महाराजांना अतिशय भव्य आणि दिमाखदार सशस्त्र मानवंदना दिली. कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेल्या रोहा शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ब्रिटीशांच्या काळापासून धावीर महाराज देवस्थानास पोलिसांची सशस्त्र मानवंदना देण्याचा बहुमान दिला आहे. मागील वर्षी पालकमंत्री उदय सामंत या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या या धावीर महाराज पालखी सोहळ्याला रायगड पोलिसांच्यावतीने देण्यात येणारी मानवंदना भव्य स्वरूपात आणि दिमाखदार असेल. देवस्थानाला दिली जाणारी पोलिस वंदना हे देवस्थानाचेच नव्हे तर आपल्या राज्यासाठी देखिल कायमस्वरूपी वैशिष्ट्यपूर्ण असेल असे जाहीर केले होते. त्यांनुसार रायगड पोलीस दलाने पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशांनुसार यंदा अतिशय भव्य सशस्त्र मानवंदना दिली आहे.
सकाळी साडेसहाच्या सुमारास रायगड पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली रायगड पोलीस दलाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र सलामी दिली. यावेळी रायगड पोलीस दलाचे बँड पथक यांचेही संचलन झाले. रायगड पोलीस दलाचे श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना झाल्यानंतर श्री धावीर महाराज की जय असा एकच जयघोष श्री धावीर महाराज मंदिर पटांगण परिसरात दुमदुमलला. श्री धावीर महाराज पालखीमध्ये विराजमान झाल्यानंतर श्री धावीर महाराज पालखी सोहळयाला सुरुवात झाली. सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते. त्यांनी धावीर महारांजाचे दर्शन घेतले.







