आक्षी गावातील आद्य शिलालेखाला अभिवादन

। आक्षी । प्रतिनिधी ।

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आक्षी गावातील मराठी भाषेतील आद्य शिलालेखाला अभिवादन करण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली कित्येक वर्षे हा शिलालेख दुर्लक्षित होता. त्याचे सुशोभिकरण व्हावे, यासाठी आक्षी ग्रामपंचायत, पुरातन विभाग आणि इतिहासप्रेमींकडून सातत्याने राज्य सरकारकडे प्रयत्न करण्यात येत होते. दरम्यान, गेल्यावर्षी या शिलालेखाचे राज्य शासनाच्या वतीने सुशोभिकरण करण्यात आले आहे. तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आज हा शिलालेख सुयोग्य जागेत प्रस्तापित करण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करून शिलालेखाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

मराठी भाषेतील आद्य शिलालेखाचं आक्षी गावात असणं हे आपलं भाग्यच म्हणावं. याआधी हा शिलालेख जतन व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. आता या शिलालेखाचे महत्त्व संपूर्ण राज्यात कसे पोहोचवता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे गावातील पर्यटन व्यवसायवाढीसाठीसुद्धा चालना मिळेल.

रश्मी पाटील, सरपंच, आक्षी
Exit mobile version