| महाड | प्रतिनिधी |
ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध संघटनांच्या वतीने चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच गर्दी झाली होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महाडमधील तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. सकाळपासून चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी गर्दी झाली होती. शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आणि शहरातील नागरिकांनी तसेच तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष केला.
प्रशासनाच्या वतीने शासनाचे सर्व विभागांचे अधिकारी यावेळी चवदार तळे येथे उपस्थित होते. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील चवदार तळे येथे येऊन महामानवाला अभिवादन केले. महाड तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारिप बहुजन महासंघ, अशा अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील या ठिकाणी अभिवादन केले. तालुक्यासह अनेक ठिकाणाहून आलेल्या भीम ज्योतींचे स्वागत देखील या ठिकाणी करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, क्रांतीस्तंभ या ठिकाणीदेखील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली.







