गर्भवती असूनही स्पर्धेत खेळली
। पॅरिस । वृत्तसंस्था।
ऑलिंपिकसाठी पात्र ठरून आपली गुणवत्ता सादर करण्याकरिता वयाचे बंधन नाही; पण पॅरिस ऑलिंपिक त्याही पलीकडे गेले आहे. इजिप्तची नादा हफिझ ही सात महिन्यांची गर्भवती असून ती सोमवारी (दि.29) झालेल्या महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली. 26 वर्षीय नादा हफिझ ही वैयक्तिक सब्रे गटात सहभागी झाली होती. परंतु, तिला पराभव पत्करावा लागला.
हफिझ ही इजिप्तची राजधानी कैरोतील रहिवासी आहे आणि हे तिचे तिसरे ऑलिंपिक आहे. माझ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑलिंपिकमध्ये खेळणे हे प्रतिष्ठेचे आहे, अशी भावना हफिझने यावेळी व्यक्त केली. हफिझने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या एलिझाबेथ तार्ताकोवस्की हिचा 15-13 असा पराभव शानदार सुरुवात केली होती. परंतु, पुढच्या फेरीत तिला दक्षिण कोरियाच्या जिऑन ह्याँगकडून पराभव स्वीकारावा लागला.
या दोन सामन्यांत माझ्यासह माझ्या मुलाचाही शारीरिक आणि मानसिकतेचा तेवढाच वाटा आहे,’’ असे हफिझ म्हणते. गर्भवती राहणे सोपे नाही. वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो, तसेच, हे जीवन आणि खेळ यांच्यातील समतोलपणा साधण्यासाठीही कसरत करावी लागते; पण खेळासाठी हे सर्व सहन करण्यासारखे आहे, असे सांगणार्या हफिझने पती इब्राहिम आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानले.
सोमवारी मी व्यासपीठावर आले तेव्हा आम्ही तिघे तेथे होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि अजून या विश्वास येण्याच्या प्रतीक्षेत असलेले माझे मूल.. अशी माहिती स्वतः हफिझने सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली होती.







