अलिबागच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे जयंती साजरी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांची अलिबागमध्ये ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. अलिबागमधील सार्वजनिक वाचनालय,जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सभागृहात शनिवारी (दि.3) जयंती साजरी करण्यात आली. ग्रंथालयाचे जेष्ठ संचालक नागेश कुळकर्णी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वाचनालयाच्या ग्रंथपाल रजिता माळवी, वाचनालयातील कर्मचारी अर्पूव वर्तक, अर्चना माळवी, मिलिंद सुळे, वाचक वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी नागेश कुळकर्णी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून मी त्यांना अभिवादन करतो. सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात स्त्री शिक्षणाला होत असलेला विरोध झुगारून स्वतः शिक्षण घेतले. शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करून त्या मुख्याध्यापिका झाल्या. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे अमूल्य योगदान हा देश कधीही विसरू शकणार नाही, असे कुळकर्णी म्हणाले.





