16 जूनपासून मूक आंदोलनाची हाक
। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी अखेर आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन मूक असून, 16 जूनपासून सुरू होणार आहे. ‘आम्ही बोललो, आता तुम्ही बोला’, असं या आंदोलनाचं घोषवाक्य असून, आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदारांना बोलावून भूमिका मांडण्याची विनंती केली जाणार आहे. या मूक आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्यास मुंबईत विराट ‘लाँग मार्च’ काढला जाईल आणि तो सरकारला परवडणारा नसेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी गुरुवारी कोल्हापुरात समन्वयकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ’मराठा समाजाने जी ताकद दाखवायची होती, ती दाखवली आहे. पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवून वेठीस धरणं योग्य होणार नाही. ज्या लोकप्रतनिधींना समाजानं निवडून दिलं, त्यांची आता खरी जबाबदारी आहे. त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणं महत्त्वाचं आहे. मराठा समाजाला राजकीय पक्षांच्या वादांमध्ये स्वारस्य नाही. आरक्षणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांची आहे अशी आमची भूमिका आहे,’ असं संभाजीराजे म्हणाले.