समिंदर आजपासून गजबजणार

नव्या हंगामाचा आज श्रीगणेशा; उरणच्या मच्छीमारांची लगबग
| उरण | प्रतिनिधी |
गेले तीन महिने बंद असलेल्या मासेमारीला सोमवारीपासून प्रारंभ होत आहे. नव्या हंगामाचा श्रीगणेशा करण्यासाठी उरणचा कोळीबांधव सज्ज झाला असून, कोळीवाड्यांमध्ये लगबग सुरु झाली आहे. उरणच्या करंजा व मोरासह इतर बंदरातील खलाशी आणि मच्छीमार यासाठी तयारीला लागले आहेत. बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छीमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत मत्स्य खवय्यांसाठी भरपूर ताजी आणि स्वस्त मासे उपलब्ध होणार आहेत.

जून व जुलै महिने हा दोन माशांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो. तसेच हा पावसाळा काळ असल्याने समुद्र खवळलेला असल्यामुळे 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छीमार बांधवदेखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्यांच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. या बंदीच्या दोन महिन्यांत त्यांनी ही आपली कामे पूर्ण केली असून आत्ता मोठ्या आनंदात, गाणी गात आपल्या होड्या घेऊन सातासमुद्रापलीकडे मच्छीमारी करता जाणार आहेत.

उरण तालुक्यातदेखील मच्छीमारांची संख्या लक्षणीय आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करतात. देशाच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावणारा दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षितांचे जिणे जगत असतो. शासनाने या कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. मच्छीमारांना शासनाने देऊ केलेला डिझेलचा परतावा प्रत्यक्षात वर्षानुवर्षे मिळत नाही. त्यातच परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण हा आत्ता महाराष्ट्राच्या मच्छीमारांसाठी मोठी समस्या झाली आहे.

करंजा, मोरा, दिघोडा किनार्‍यावर दोन महिने शाकारून ठेवलेल्या बोटी मासेमारीच्या नव्या हंगामासाठी तयारीला लागल्या आहेत. दोन महिने बोटी बंद राहत असल्याने बोटीवरील जाळी, ती ओढण्यासाठी असलेली यंत्रे बोटीची सफाई करण्यास वेळ लागत आहे.

– प्रदीप नाखवा, करंजा मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष



Exit mobile version