वाळूमाफियाचा निवृत्त कर्मचाऱ्यावर हल्ला

डोक्यात फावडे मारुन केले जखमी

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा बाबाजी दिवेकर यांनी वाळूमाफियांना रोखल्याने त्यांच्या डोक्यात फावडे मारुन त्यांना जखमी केले. सदरची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

नांदगावकर ग्रामस्थ संतप्त झाले असून महसूल खात्याने आता तरी लक्ष देऊन यावर प्रतिबंध आणावा अशी मागणी केली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात प्रकाश नारायण राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कृष्णा दिवेकर यांनी राऊत यांना वाळू उत्खनन करताना हटकले. यावेळी दिवेकर यांचे मित्र परेश दांडेकर सोबत होते. वाळू नेण्यास प्रतिबंध केल्याने दिवेकर आणि राऊत यांच्यात वाद झाला. अवैध वाळू काढणारे राऊत यांनी समुद्र काय तुमच्या बापाचा आहे काय, आम्ही येथूनच वाळू काढणार, असा सूर लावला. यावेळी दिवेकर हे वाळू भरण्यास अडथळा आणत असल्याचे पाहून राऊत यांनी फावड्याचा लाकडी दांडा कपाळावर मारून त्यांना जखमी केले.

दोन टेम्पो व दोन बैलगाडीमधील वाळू पकडून मुरुड पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत नांदगाव बीच पर्यटन संस्थेचे अध्यक्ष महेश मापगावकर यांनी सांगितले की, नांदगाव समुद्रकिनाऱ्यावरील बेसुमार वाळू काढली जात आहे. महसूल खाते सुस्त असल्याने अवैध रेती काढणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. महसूल खात्याने यावर प्रतिबंध आणावा अन्यथा येथे आज एक व्यक्ती जखमी झाली आहे, यापुढे काहीही होऊ शकते.

Exit mobile version