धरमतरच्या खाडीत वाळू उत्खननाला ऊत

| पेण | प्रतिनिधी |
धरमतर खाडीत अवैध वाळू उत्खननाला ऊत आलेला आहे. गेल्या आठवड्यात पेण-अलिबाग तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे महसूल खाते व पोलीस खाते व्यस्त असल्याने वाळूमाफियांचे रान मोकळे झाले होते. त्यामुळे धरमतर खाडीत दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू होते. यामध्ये गेल्या आठवडाभरात करोडो रुपयांचा महसूल वाळूमाफियांनी बुडविला. त्यातच काही अधिकारीदेखील या वाळूमाफियांना मदत करत होते.

अचानक अलिबाग आणि पेणच्या महसूल टीमने धरमतर खाडीत छापे मारले असता, महाकाय लोखंडी बार्ज, सक्शन पंप हाती लागले. तर काही छोट्या होड्यांना पळून जाण्यात यश आले. सक्शन पंप जप्त करून वडखळ पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केले आहे. तर बार्ज खाडीतच जप्त करून उभी ठेवली आहे. या वाळूमाफियांमध्ये उरणचा मंगेश, आवासचा सचिन, तर जम्मू-काश्मीरचा लकी यांचा समावेश आहे. ही बाब रायगड महसूल खात्याला, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला तसेच वन खात्याला माहीत असूनदेखील कारवाई होत नाही.

गुरूवार, दि. 22 डिसेंबर रोजी सक्शन पंप व बार्ज जप्त करूनदेखील 22 डिसेंबरच्या रात्री महसूल खात्याच्या अधिकार्‍यांच्या नाकावर टिचून सचिन नामक या वाळूमाफियाने धरमतरच्या खाडीत रातोरात शेकडो ब्रास वाळू काढली, अशी चर्चा आहे. ते खरे असेल, तर महसूल खात्याला हे वाळूमाफिया जुमानत नाहीत, हेच खरे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, वाळू काढण्यासाठी ज्या कोंड्या तयार केल्या जातात, त्यामध्ये सर्रास कांदळवनांची तोड होत आहे. मात्र, या कांदळवनाच्या तोडीकडे वनखात्याचे दुर्लक्ष आहे की वाळूमाफियांचे लक्ष्मीदर्शन वनखात्याच्या अधिकार्‍यांना होत आहे, असा प्रश्‍न लोक विचारत आहेत. या बाबीकडे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष देतील का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

मंगेश, सचिन, लकी या मंडळीला मोठ्या राजकीय पुढार्‍याचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच ही मंडळी बिनधास्तपणे कारवाईची तमा न राखता खुलेआम अवैधरित्या धरमतरच्या खाडीत वाळू उत्खनन करत आहेत. यांच्यावर कारवाई होईल का, असा प्रश्‍न कार्यकर्ते विचारत आहेत.

Exit mobile version