शेकापचे नेते जयंत पाटील, ॲड. उमेश ठाकूर यांच्याकडून परवानासाठी मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि काँग्रेसचे ॲड. उमेश ठाकूर यांनी रायगड जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, हातपाटी रेती व्यवसायासाठी शासकीय परवाने तातडीने मंजूर करण्याची ठाम मागणी केली आहे. शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने हातपाटी व्यावसायिक व शेकडो कामगार उपासमारीच्या संकटात सापडले आहेत.
रायगड जिल्ह्यात हातपाटी पद्धतीने रेती व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. महसूल व वन विभागाचे वाळू-रेती निर्गती धोरण 8 एप्रिल 2025 रोजी लागू झाले असून, या धोरणानुसार हातपाटी रेती व्यवसायास मान्यता देत तातडीने परवाने देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र, धोरण लागू होऊनही रायगड जिल्हा प्रशासनाने अद्याप परवाना प्रक्रिया सुरू न केल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.
परवाना न मिळाल्याचा थेट फटका हातपाटी व्यावसायिक व कामगारांना बसत असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाचा कारभार ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे सुरू असल्याची टीका जयंत पाटील यांनी करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ॲड. उमेश ठाकूर यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला असून, तातडीने शासकीय परवाने मंजूर न झाल्यास 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण तसेच तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.






