मुंबईच्या रेसकोर्सवर माथेरानच्या संदेशची घोडेसवारी

| माथेरान | वार्ताहर |

मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकत्याच पार पडलेल्या अश्‍वशर्यतीत माथेरान मधील जगप्रसिद्ध जॉकी संदेश आखाडे याने दैदीप्यमान कामगिरी करून यावर्षी देखील सर्वोत्कृष्ट घोडेस्वार होण्याचा पुरस्कार पटकाविला असून माथेरानच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.

माथेरानच्या लाल मातीतून तयार होऊन अश्‍वशर्यतीच्या विश्‍वात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले नामवंत जॉकी आहेत. वसंत शिंदे, प्रमोद बेलोसे व रवि बिरामणे हे सुप्रसिद्ध जॉकी देखील माथेरानच्या लाल मातीतलेच. यांचाच आदर्श घेऊन माथेरान मधील अनेक तरुण घोडेसवारीकडे आकर्षित झाले आहेत. यापैकी संदेश आखाडे या तरुण जॉकीने या क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असून संपूर्ण देशातून नव्हेतर देशा बाहेर जाऊन देखील अश्‍वशर्यती जिंकल्या आहेत.

या वर्षीच्या मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकत्याच पार पडलेल्या अश्‍वशर्यतीत संदेशने दैदीप्यमान कामगिरी करत सर्वात जास्त अश्‍वशर्यती जिंकून यावर्षीचा सर्वोत्कृष्ट घोडेस्वार होण्याचा पुरस्कार पटकावला आहे. हा सर्वोत्कृष्ट घोडेस्वार होण्याचा त्याचा 18 वा पुरस्कार असल्याचे या वेळी संदेश याने सांगितले.

मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स येथे अश्‍वशर्यती सुरू असताना या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संदेशला पुरस्कार प्रदान करण्यात आला. जॉकीसंदेश आखाडे याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माथेरानकरांनी आनंद व्यक्त केला असून सर्व स्थरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

Exit mobile version