| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुका स्मार्ट मीटर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून म्हसळा विद्युत महावितरण कार्यालयात स्मार्ट मिटर बसवु नये, या बाबत शुक्रवारी (दि.21) निवेदन देण्यात आले.
या पूर्वीही याच समितीकडून स्मार्ट मिटर बसवु नये म्हणून निवेदन देण्यात आले होते. परंतु, त्या निवेदनाला महावितरणकडून केराची टोपली दाखविली व आपला मनमानी कारभार सूरु ठेऊन ग्राहकांची फसवणुक करण्यात आली असल्याचे समितीकडुन सांगण्यात आले. दरम्यान, येत्या पंधरा दिवसांच्या स्मार्ट मिटर बसविण्याचे काम थांबविण्यात न आल्यास समितीच्या आणि नागरिकांच्या माध्यमातून तिव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आल्याचे समितीचे सल्लागार संतोष पाटील यांनी सांगितले. यावेळी समिती अध्यक्ष समीर काळोखे, सल्लागार संतोष पाटील, नईम दळवी, सुरेश कुडेकर, फारूक पेनकर, नगरसेवक सुनिल शेडगे, प्रकाश घाणेकर, सुमित सावंत, अशोक पाटील, सलाऊद्दीन घराडे, नजीर जहाँगीर, प्रविण बनकर, राजु लाड, अनंत रिकामे तसेच तालुक्यातुन असंख्य ग्राहक उपस्थित होते.
जुने मिटर सुस्थितीत असुन देखील ग्राहकांना न विचारता स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वारेमाप विज बिल येत असून आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे. जर का स्मार्ट मिटर बसविणे थांबविले नाही, तर होणाऱ्या परिणामांना महावितरण जबाबदार असेल.
संतोष पाटील,
सल्लागार संघर्ष समिती
