नागपुरातून राहुल गांधींचा हल्लाबोल
| नागपूर | प्रतिनिधी |
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचारसभेच्या आधी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नागपूरमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनात बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले. संघ संविधानावर लपूनछपून हल्ला करणार. समोरून थेट वार करण्याची हिंमत नाही. समोरुन हल्ला केल्यास त्यांचा पाच मिनिटात पराभव होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी बुधवारी महाराष्ट्राच्या दौर्यावर आले आहेत. आपल्या दौर्याची सुरुवात त्यांनी नागपूरपासून केली. नागपूरमध्ये आगमन झाल्यावर त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरेश भट सभागृहात आयोजित संविधान सन्मान संमेलनाला संबोधित केले. राहुल यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलायचे तेव्हा त्यांचा आवाज हा कोट्यवधी शोषित समूहाचा आवाज होता. बाबासाहेब बोलायचे तेव्हा दुसर्यांचं दुःख त्यांच्या तोंडून निघत होते. जेव्हा आपण आंबेडकर, गांधींची चर्चा करतो, तेव्हा आपण एका व्यक्तीबाबत बोलत नाही असे राहुल यांनी म्हटले.
राहुल यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, काँग्रेस नव्हे तर देशातील जनतेने बाबासाहेबांना संविधान बनवण्यास सांगितले. देशात कोट्यवधी दलित आहेत, त्यांचे दु:ख, त्यांचा आवाज या संविधानात यायला हवा अशी त्यांचे म्हणणे होते. या संविधानात फुले, आंबेडकर आणि गांधी यांचा आवाज आहे. आपण संरक्षण करतोय ते हजारो वर्षे जुने पुस्तक आहे. देशात आम्ही एक दुसर्यांचा आदर करणार, असे म्हटले आहे. यात कुठे लिहिलं नाही एक व्यक्ती देशातील धन, भविष्य घेऊ शकेल. यात लिहिले की इथे समानता आहे.
भाजप, संघ या संविधानावर आक्रमण करत आहे. त्यांचा हा हल्ला देशाच्या आवाजावर हल्ला असल्याचे राहुल यांनी सांगितले. संविधानामुळे निवडणूक आयोग आणि इतर संस्था निर्माण झाल्या आहेत. संघ संविधानावरून समोरून हल्ला करू शकत नाही. समोरून वार केल्यास ते पाच मिनिटात हरतील, हे त्यांना ठाऊक आहे आणि म्हणूनच हे लपून हल्ला करतात. विकास, प्रगती अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून येतात आणि संविधानावर हल्ला करतात, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.