स्वच्छता दूतांना मिळणार विम्याचे संरक्षण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

आझाद कामगार संघटनेच्या पाठपुरावाला यश

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांचा विमा संरक्षण दिले जाणार आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीला या पोटी 1 कोटी 80 लाख 80 हजार रुपये अदा करून चलन जमा करण्याचे लेखी आदेश मनपा प्रशासनाने ठेकेदाराला दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार स्वच्छता कामगार, त्यांची मुलं आणि आई-वडिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केलेल्या अखंडित पाठपुराव्याच हे अखेर यश आहे.

महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता दूतांना बेसिक 11 हजार 500 इतका मोबदला दिला जात आहे. त्याचबरोबर विशेष भत्ते 8610 आणि एचआरए 1005 असे एकूण 21,115 वेतन दिले जात आहे. नियमानुसार 21 हजाराहून अधिक कामाचा मोबदला मिळत असेल तर संबंधित ईएसआयसीच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना ही योजना लागू होत नाही. पनवेलचे आरोग्य आणि स्वच्छता राखणाऱ्या या दूतांना आरोग्य विमा मिळावा, या उद्देशाने आझाद कामगार संघटना गेल्या दोन वर्षांपासून पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. या मागणीसाठी महादेव वाघमारे यांनी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाकडून त्यांना चर्चेस बोलवल्यानंतर काही दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांनी साई गणेश इंटरप्राईजेसला लेखी आदेश निर्गमित केले आहेत. मेसर्स इफिसेंट ब्रोकर, इन्शुरन्स ब्रोकर प्रायव्हेट कंपनीने दिलेल्या न्यूनतर दर पत्रकानुसार नॅशनल इन्शुरन्स कंपनीला एक कोटी 80 लाख 80 हजार रुपये इतक्या रक्कम अदा करून त्या संदर्भातील चलन महापालिका प्रशासनाकडे सादर करावे. त्यानंतर प्रतिपुर्ती देयके महापालिका देईल असेही या आदेशामध्ये म्हटले आहे. याची प्रत आझाद कामगार संघटनेलाही देण्यात आली आहे.

दोन लाखांचा मेडिक्लेम कव्हर
महानगरपालिकेकडून दोन लाखांचा मेडिकल कव्हर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये संबंधित स्वच्छता विषयक कर्मचारी, पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांचा समावेश करावा अशा प्रकारचा प्रस्ताव आझाद कामगार संघटनेने दिला होता. तो मंजूर करून संपूर्ण कुटुंबालाच मेडिक्लेम कव्हर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आदेशामध्ये आहे.

पालिका क्षेत्रातील आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या स्वच्छता दूतांना विमा कवच मिळावा, यासाठी आझाद कामगार संघटना अखंडितपणे पाठपुरावा केला. ईएसआयसीचा लाभ मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेवटी आमच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. विमा कंपनीला पैसे अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या या भूमिकेचे आझाद कामगार संघटना, स्वच्छता विषयक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आम्ही स्वागत करून आभार मानत आहोत.

महादेव वाघमारे
अध्यक्ष
आझाद कामगार संघटना

Exit mobile version