स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड दुर्गंधी, रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी श्रीवर्धन, म्हसळा, तळा या तालुक्यांमधील ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. येणारे रुग्ण आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांची उपचाराची व्यवस्था उत्तम असलीतरी स्वच्छता गृहांची अवस्था बिकट आहे. रुग्णालयात पसरलेल्या दुर्गांचीमुळे तेथील अधिकारी, कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. या दुर्गंधी आणि स्वच्छतेकडे रुग्णालय प्रशासनने दुर्लक्ष केल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बारा वर्षांपूर्वी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली. अगोदरची जुनी इमारत जीर्ण झालेली होती व त्या इमारतीमध्ये अनेक सोयीसुविधा नव्हत्या. कोरोना महामारीच्या वेळी देखील रुग्णालयात अनेक कोरोना बाधित रुग्णांनी उपचार घेतले व ते बरे देखील झाले. कोरोना काळात संपूर्ण रुग्णालयामध्ये गॅस लाईन फिरवण्यात आलेली आहे. ज्यामुळे कोणत्याही रुग्णाला प्राणवायू तात्काळ पुरविण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे.
आजमीतिला रुग्णालयात असलेला वैद्यकीय अधिकारी, महिला अधिपरिचारिका, पुरुष अधिपरिचारक हे उत्तम काम करत आहेत. त्या ठिकाणी दाखल असणाऱ्या रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येते. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचे जाणवत आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीतील सर्वच स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये जाताना रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना नाक मुठीत घेऊनच जावे लागते.
उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेहमीच विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण दाखल असतात. तसेच या रुग्णांचे नातेवाईक देखील रुग्णांसोबत रुग्णालयात राहात असतात. या सर्व व्यक्तींकडून रुग्णालयातील स्वच्छतागृहांचा वापर केला जातो. परंतु दिवसातून केवळ एक वेळ या ठिकाणची स्वच्छतागृहे साफ करण्यासाठी स्वच्छक येत असल्याचे दिसून येते. रुग्णालयातील स्वच्छतागृहे स्वच्छ करताना त्यामध्ये जंतुनाशक फिनेल त्याचप्रमाणे लादी स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रकारे साबण, पावडर देखील वापरलेली दिसून येत नाही. रुग्णालयातील भारतीय पद्धतीची शौचालये, त्याचप्रमाणे इंग्लिश शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे.